भीम जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्याची परवानगी द्या! Jaideep Kawade यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
जयदीप कवाडे यांनी नुकतीच यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत दुरध्वनीवरून चर्चा करीत आंबेडकरी जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. शिवाय ई-मेलच्या माध्यमातूनही त्यांनी पक्षाच्या वतीने समाजाच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत.
नागपूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक सांस्कृतिक देखाव्यांसह मिरवणुकीस परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष (National President of the People’s Republican Party) जयदीप जोगेंद्र कवाडे (Jaideep Jogendra Kawade) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. जयदीप कवाडे यांनी नुकतीच यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत दुरध्वनीवरून चर्चा करीत आंबेडकरी जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. शिवाय ई-मेलच्या माध्यमातूनही त्यांनी पक्षाच्या वतीने समाजाच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत. कोरोना महारोगराईमुळे सामाजिक दायित्वाचे वहन करीत अत्यंत साध्या पद्धतीने आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा केला.
बैठकीतून तोडगा निघेल
आता कोरोना महारोगराई जवळपास आटोक्यात आली आहे. अशात आंबेडकरी जनतेच्या भावनेचा विचार करीत भव्य मिरवणुका काढण्याची परवानगी देण्याची मागणी जयदीप कवाडे यांनी केली आहे. आंबेडकरी जनतेच्या भावनांचा विचार करीत या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी लवकरच उच्च स्तरावरील बैठक घेण्यात येईल. बैठकीतून या संबंधी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले आंबेडकरी जनतेचा आदर करतो
आम्ही आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करतो. यंदा राज्य सरकार आंबेडकर जयंतीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावणार नाही. शासन स्तरावरही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू, असंही मुख्यमंत्री म्हणाल्याचं जयदीप कवाडे यांनी सांगितलं.