Nagpur | कर्ज फेडण्यासाठी बनला चोर, वाहनचालकाने केली गाड्यांची चोरी; विक्रीच्या बेतात असताना अडकला
स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी कार आणि बाईक चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अजनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इंडिगो आणि इनोव्हा या दोन कार आणि तीन बाईक जप्त करण्यात आल्या.
नागपूर : कर्ज घेतल्याशिवाय घर, लग्न होत नाही, असं समजलं जातं. पण, कर्ज घेताना ते किती घ्यायचं याचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा हे कर्ज कोणाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. नागपुरातल्या एक कर्जात डुबलेल्या व्यक्तीनं वाहनांची चोरी केली. ती वाहनं विकण्याच्या बेतात असताना तो अजनी पोलिसांच्या जाळ्यात आला. आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.
स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी कार आणि बाईक चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अजनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इंडिगो आणि इनोव्हा या दोन कार आणि तीन बाईक जप्त करण्यात आल्या. त्यानं 5 गुन्ह्यांची कबुली दिल्याचं अजनीचे एसीपी गणेश बिरासदार यांनी सांगितलं.
अशी करायचा चोरी
नागपुरातील अजनी पोलिसांनी एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला अटक केली असता तो कार आणि बाईक चोर निघाला. प्रज्वल विजय हटवार असे आरोपीचे नाव आहे. तो रोजंदारी पद्धतीने कार चालक म्हणून काम करायचा. कार चालवून झाली की चाबी हरविल्याचा बहाणा करत तो दुसरीकडं लपवून ठेवायचा. आणि मग तीच कार तो रात्री चोरी करायचा. त्यानं अशा पद्धतीनं एक इनोव्हा आणि एक इंडिका कार चोरी केली. दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याने 3 बाईक चोरी केल्या.
तांत्रिक पद्धतीने तपास
पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यात आणखी काही जणांच्या सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. अजनी पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. गिट्टीखदानमध्ये एका गुन्ह्याची नोंद आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून डीबी टीमनं अटक केली. सहा लाखांचा माल जप्त केला. ही कारवाई विजय तलवारे आणि डीबीची टीम आशीष ठाकूर, खेमराज पाटील, गजानन माहुलकर, अतुल दवंडे यांनी केली.