Nagpur Lockdown: 15 मार्चपासून कडक निर्बंध, मात्र नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध
आता नागपुरात लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. | Lockdown in Nagpur
नागपूर: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown in Nagpur) करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. लॉकडाऊन म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा उद्योग आहे. लॉकडाऊन करुन काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी मांडली. त्यामुळे आता नागपुरात लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. (Lockdown in Nagpur from 15 March to 21 March 2021)
संदीप जोशी गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन हा वेडेपणाचा निर्णयआहे. पालकमंत्र्यांनी हेकेखोरपणाने हा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार नाही. त्याऐवजी दंडवसुली वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करता आली असती, असे संदीप जोशी यांनी म्हटले.
नागपुरात लॉकडाऊन लावण्याची वेळ का आली?
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत (11 मार्च सकाळी 8 वाजता) 1710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असतानाही अनेक जणांच्या वर्तनात सुधारणा दिसत नाही. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणंही वाढलंय. कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 34 हजार 023 वर पोहोचला आहे.
कोरोनाचा चढता आलेख
11 मार्च – 1710 नवे रुग्ण – 8 मृत्यू 10 मार्च – 1433 नवे रुग्ण – 3 मृत्यू 9 मार्च – 1049 नवे रुग्ण – 1 मृत्यू 8 मार्च – 1037 नवे रुग्ण – 7 मृत्यू 7 मार्च – 1037 नवे रुग्ण – 3 मृत्यू 6 मार्च – 904 नवे रुग्ण – 5 मृत्यू
विनामास्क वावर
नागपुरात अनेक जण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात निम्मे लोक सर्रास विनामास्क वावरतात. भाजीपाला खरेदीसाठी हजारो लोक एकत्र आले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नागपूर शहरात 14 तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानुसार शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं, याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले, मात्र रस्त्यावर बिनकामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही.
संबंधित बातम्या :
नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध
MPSC Preliminary Exam | मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर
CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस
(Lockdown in Nagpur from 15 March to 21 March 2021)