Nagpur School Reopen गावातले चिमुकले जाणार आजपासून शाळेत, शहरातल्यांना 10 पर्यंत थांबा
जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत सर्व शाळांची सुरुवात 1 डिसेंबरपासून होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी केले आहे.
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातील चिमुकले आता तब्बल दीड वर्षानंतर शाळेत जातील. परंतु, शहरी भागातील चिमुकल्यांना 10 डिसेंबरपर्यंत शाळेत जाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या भीतीनं हा निर्णय घेण्यात आलाय.
जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत सर्व शाळांची सुरुवात 1 डिसेंबरपासून होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा यापूर्वीच नियमितपणे सुरू झाल्या आहेत. एक डिसेंबरपासून ग्रामीण क्षेत्र, नगरपालिका, नगर पंचायती क्षेत्रातील 2014 शाळा सुरु होत आहेत.
दोन सत्रात वर्ग घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक केले आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकामध्ये सहा फूट अंतर व जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळांमध्ये दोन सत्रात वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरी एक ते सातचे वर्ग 10 डिसेंबरपासून
नागपूर : मनपा क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास 10 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन 10 डिसेंबरनंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.
सध्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन आढळून आलाय. जागतिक आरोग्य संघटनेने सदर विषाणू प्रकारास व्हेरियंट आफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळं नागरिकांनी सर्व कोविड नियमांचे पालन करावे. घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.