Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप
नागपूर शहर पोलीस दलात कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 1500 च्यावर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बाधित झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सगळ्यांना सौम्य लक्षण असून कोणीही रुग्णालयात भरती नाहीत.
नागपूर : शहरांमध्ये रोज कोरोनाचा आकडा वाढतो आहे. कोरोनाने सगळ्या विभागांमध्ये शिरकाव केलेला आहे. तर पोलीस विभागही त्यापासून वेगळा नाही. रोज नागपूरच्या पोलीस विभागातील (Nagpur Police Department) कर्मचारी हे पॉझिटिव्ह येत आहेत. आतापर्यंत नागपूर शहरातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून 1500 च्या वर जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 1176 पोलीस कर्मचारी अधिकारी सध्या ऍक्टिव्ह रुग्ण (Staff officers are currently active patients) आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांच्यासह इतर डीसीपी अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. सगळे गृहविलगीकरणात असल्याची माहिती पोलीस रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी दिली. पोलिसांना नेहमी जनतेमध्ये जाऊन काम करावं लागतं. त्यांचा लोकांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या संसर्गाचा मोठा परिणाम त्यांच्यावर होत आहे. मात्र शहरातील व्यवस्थेच्या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित असल्याने यंत्रणेवर ताण येताना दिसतो आहे.
नागपूर पोलिसांना हायजिनीक किटचे वाटप
कोरोनाच्या काळात विप्रो कंज्युमरतर्फे मदत करण्यात आली आहे. डॉक्टर व पोलिसांनी देवदूत रूपात येऊन अतिशय उत्कृष्ट कार्य केले. जीवाची बाजी लावून शेकडो लोकांचे जीव वाचविले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत विप्रो कंज्यूमरच्यावतीने नुकतेच नागपूर पोलीस मुख्यालयात पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांच्याकडे पोलिसांकरिता हायजिनीक किट सुपूर्द केल्या आहेत. यापूर्वीसुद्धा नागपूर पोलीस दलाला हायजिनिक किट, मास्क, थर्मल स्कॅनर मशीन, मेयो रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालयाला हायजिनीक किट, आरटीपीसीआर, बायो कॅबिनेट, पीपीई किटचे विप्रोतर्फे वितरण करण्यात आले. विप्रोचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रमोद दक्षिणकर, एरिया व्यवस्थापक केशव क्रिष्णन तसेच शरद वाजपेयी, गोपाल बेसरकर यांनी या किट्स पोलिसांना प्रदान केल्या.
पोलीस सुरक्षित, तर देश सुरक्षित
कोरोनासारख्या संकट काळात पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीने मोठे काम केले आहे. पोलिसांचे सामाजिक कार्य पाहून नागरिकांनीही त्यांना प्रोत्साहित आणि कौतुक केले. फुटपाथवरच्या गरीब लोकांना पोलिसांनी अन्नाची पाकिटे वाटप केली. त्यामुळे लोकांच्या मनातील पोलिसांविषयी प्रतिमा बदलली आहे. कोरोना काळात अनेक पोलीस आपल्या परिवारापासून दूर राहून सेवा देण्यासाठी जीवापार प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या कार्यामुळे देश सुरक्षित आहे. त्यामुळं पोलीस सुरक्षित राहावे, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे विप्रोचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रमोद दक्षिणकर यांनी सांगितलं.