Devendra Fadnavis : फडणवीस 2024मध्ये मुख्यमंत्री होणार का?; सुषमा अंधारे म्हणातात, देवा भाऊ, तुमच्या नशिबात…
उद्धव ठाकरेंच्या काळात कुठेही मॉबलिंचिंग किंवा लाठीचार्ज झाले नाहीत. मात्र आता बघा वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज होतो. हे यांचं सरकार आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 20 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आणि घणाघाती टीका केली आहे. फडणवीस साहेब, तुमच्या नशिबी मुख्यमंत्री पदाची खुर्ची नाही. 2024 मध्ये तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. तसा संकल्पच आम्ही महाप्रबोधन यात्रेतून करत आहोत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. जे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार त्यांचा हिशोब आम्ही चक्रवाढ व्याजाने घेणारच, असा इशाराच अंधारे यांनी दिला.
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नागपुरातून सुरू करण्यात आला. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना टार्गेट करत जोरदार टीका केली. मला देवा भाऊ हा मोठा अभ्यासू माणूस आहे असं वाटायचं. पण तसं झालं नाही. आरएसएसचे लोक लोकांचे असेसमेंट करताना दुसऱ्याला बदनाम करतात. मात्र स्वतःच्या लोकांवर बोलत नाहीत. उद्धव साहेबांवर टीका करून काही लोक गेली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन आम्ही ते कशासाठी गेले हे सांगितलं. पक्ष फोडणे म्हणजे म्हणजे विकास नाही. आदित्य उदय होणारच आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
एकही माणूस घडवला नाही
शरद पवार यांनी अनेक नेते घडविले. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना घडविलं. पण देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडविलं? मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण एकही माणूस दिसत नाही. दिसतात ते भाड्याने आणलेली माणसं. भाजप म्हणजे भाड्याने घेणारी पार्टी झाली आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. तुम्ही पक्ष फोडले. माणसं फोडली. त्यामुळे सरकार अस्थिर झाले. गुंतवणूक बाहेर जायला लागली, असा आरोपही त्यांनी केला.
त्या कामगारांचं काय झालं?
ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्याच लोकांसोबत तुम्ही सरकार बनवलं. कोव्हिडमध्ये जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगारांनी कामे केली. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. आरोग्यमंत्री सुद्धा सांगतात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित करू. पण झालं काय? यांच्याकडे पैसे का नाही? हे त्यांनी सांगितलं पाहिजे. विरोधी पक्षात असताना कामगारांचा विचार करणाऱ्या देवा भाऊंना सत्तेत आल्यावर कामगारांचा प्रश्न का आठवत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
महाराष्ट्र अशांत ठेवण्यासाठी…
महाराष्ट्र अशांत ठेवण्यासाठी ते वेगवेगळ्या टीम कामाला लावतात. त्यांच्याकडे यासाठी सदावर्तेंसारखे लोक आहेत. या निवडणुकीत जनतेने आता फडणवीस यांना प्रश्न विचारायला पाहिजे, ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या सोबत कसे बसता? त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना ते धमक्या देतात. बोलणाऱ्यांच्या तोंड बंद होणार म्हणतात. डीसीपीची कॉलर पकडणारे यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र त्यावर काही बोलत नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.