…तर सभागृहात जाण्यात अर्थ नाही, दिलीप वळसे पाटील असं का म्हणालेत?
मला असं वाटतं राजकीय फायद्यासाठीचं त्यांनी हा मुद्दा उचलला आहे. सरकार येणार की, नाही हे जनता ठरवेल.
नागपूर : अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सीमावादाच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील म्हणाले, काल सभागृहामध्ये विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात आली. सत्तारुढ पक्षाच्या आमदारांनी बोलू दिलं नाही. जयंत पाटील यांना त्यांच्या प्रतिक्रियेवरून निलंबित करण्यात आलं. सभागृहात बोलू दिल जात नसेल. लोकशाहीवर त्यांचा विश्वास नसेल, तर सभागृहात जाण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं आज सभागृहात जाऊ नये, अशी भूमिका मांडली असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात. संजय राऊत यांनी त्यांना चीनचा एजंट म्हटलं. त्यावर बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे प्रकरण गेल्या कित्तेक वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे.
बोम्मई यांनी नको त्या वेळेला नको ती भूमिका घेतली. आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यासंदर्भात बैठक घेतली. तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वागण्यात काही फरक पडला नाही.
महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं जातंय. कर्नाटक सरकारनं सीमावादाच्या संदर्भात ठराव मंजूर केला. महाराष्ट्राचं सरकार त्यावर काही बोलायला तयार नाही.
सीमाभागातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीकोनातून अनेक वर्ष लढाई करत आलो आहोत. यापुढंही लढाई सुरू राहणार असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. मला असं वाटतं राजकीय फायद्यासाठीचं त्यांनी हा मुद्दा उचलला आहे. सरकार येणार की, नाही हे जनता ठरवेल. निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उचलला आहे. राजकीय फायदा घेणे हाच त्यांचा अजेंडा आहे