‘जनतेने विरोधकांना जागा दाखवली’, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्र्यांची सर्वात पहिली आणि खोचक प्रतिक्रिया
शिंदे-फडणवीसांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
नागपूर : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार दोघांसाठी महत्त्वाची होती. अखेर या निवडणुकीचा निकाल आता समोर येतोय. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, भाजप या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत असून राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरतोय. तर शिंदे गटालादेखील ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर यश मिळाल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत युतीला मिळालेलं यश हे विरोधकांना त्यांची जागा दाखवणारं आहे, अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला.
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा नागपूरमधील न्यासाच्या जमीन घोटाळ्यावरुन प्रचंड गाजला. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले. तर फडणवीसांनी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून या विषयावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असं म्हटलं. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
“युतीला गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी दुप्पट मतांनी विजय झालाय. हा विजय विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे. त्याचबरोबर गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये युतीचं काम आहे त्याची पोचपावती देणारा हा निकाल आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“आजच्या ग्रामपंचायतीच्या अतिशय घवघवीत आणि दैदीप्यमान विजय युतीला यश मिळालंय. मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
“गेल्या चार-पाच महिन्यात आपल्या सरकारने जे निर्णय घेतलेत ते लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, माता-भिगिनी या सर्वांचं सन्मान करणारं हे सरकार आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
‘जनतेनेसुद्धा सांगितलं की हेच कायदेशीर सरकार’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
दरम्यान, “जे लोकं आमच्या सरकारला नावं ठेवत होते आणि स्वत: इनलिटमेंट असताना आमच्या सरकारला म्हणत होते त्यांना न्यायालयाने सांगितलंच होतं, पण आता जनतेनेसुद्धा सांगितलं की हेच कायदेशीर सरकार आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
“मी महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो. आम्ही त्यांना आश्वस्त करु इच्छितो, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार अशाचप्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभी राहील”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.