‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं’, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्याच मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नव्हती, असा दावा केसरकरांनी केलाय.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 12 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी नोंदवली. “उद्धव ठाकरे यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनीच सांगितले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही. हे सांगताना शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हे वृत्तपत्र आणि माध्यमांतून प्रकाशित झाले आहे”, असं दीपक केसरकर आपल्या उत्तरात म्हणाले आहेत.
“जेव्हा युती झाली तेव्हाच त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत होते. पण महाराष्ट्रातील अनैसर्गिक युती ही शिवसेनेच्या हिताची नव्हती”, असंही उत्तर केसरकर यांनी फेरसाक्ष नोंदवत असताना दिलं.
नेमके सवाल-जवाब काय?
कामत – तुम्ही याआधी दिलेल्या उत्तरात म्हटला होता की, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही, तुम्ही महाविकास आघाडीसोबतची युती तोडा आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हा” हे शिंदे तुम्हाला कधी बोलले की त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही?
केसरकर – ते मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा बोलले.
कामत – शिंदे मुख्यमंत्री होण्यास इच्छुक नाहीत, हे त्यांनी तुम्हाला सांगितले का?
केसरकर – उद्धव ठाकरे यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनीच सांगितले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही. हे सांगताना शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हे वृत्तपत्र आणि माध्यमांतून प्रकाशित झाले आहे.
कामत – तुमच्या दोन्ही उत्तरात विरोधाभास आहे. एका उत्तरात तुम्ही म्हटला की तुम्ही सगळे जण उद्धव ठाकरे यांना भेटलो तेव्हा तुम्ही त्यांना सांगितले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही. तर दुसऱ्या उत्तरात तुम्ही उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला सांगितले का शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही. तुम्हाला यावर काय म्हणायचे आहे?
केसरकर – जेव्हा आम्ही बोलतोय की त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही, ते पक्षासोबत ठाम उभे आहेत. उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले की ते एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. त्यामुळे त्यांना परिस्थिती माहिती होती. म्हणून त्यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना सुरतला भेटण्यास पाठवले होते.
कामत – एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सुरतला जाण्याआधी कळवले होते का? की त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही?
केसरकर – जेव्हा युती झाली तेव्हाच त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत होते. पण महाराष्ट्रातील अनैसर्गिक युती ही शिवसेनेच्या हिताची नव्हती.
कामत – एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कोणी आणि कधी आश्वस्त केले होते?
केसरकर – बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने शिवसेनेचे नेतृत्व करणे हे असामान्य उदाहरण आहे. देशात सत्ता आल्यावरही त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले नाही. त्यामुळे शिवसेनेतील सर्व आमदारांना याची कल्पना होती, म्हणूनच ज्यावेळी वाटाघाटी चालू होत्या, तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार, अशा बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या.
कामत – ३१ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत प्रस्तावावेळी सर्व शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान केले होते?
केसरकर – होय
कामत – कामत त्यावेळी मतदान करताना तुमच्यासह सर्व शिवसेना आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला दिला होता?
केसरकर – उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार म्हणून फक्त आम्ही पाठिंबा दर्शवला होता. विशेषतः काँग्रेसने आपल्या पाठिंबाचे पत्र राज्यपालांना न दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. काँग्रेस पक्षाने आग्रह केल्यामुळे शिवसेनेच्या घटनेमध्ये लिहिलेल्या ध्येयधोरणांचा त्याग करून हिंदू संस्कृतीची पाठराखण करणे, समान नागरी कायदा, स्थानिक मराठी माणसाच्या सोबत उभे राहणे याला तिलांजली देऊन समान किमान कार्यक्रम तयार करण्यात आला. तसेच ज्या बातम्या आम्ही वृत्तपत्रात वाचल्या किंवा अनेक लोकांनी आम्हाला सांगितले की त्याप्रमाणे समान किमान कार्यक्रम सही केल्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा आम्हाला दिला. त्यामुळे आम्ही जरी उद्धवजींच्या सरकारला पाठिंबा दिला असला तरी या धोरणाला आमचा पाठिंबा नव्हता. पक्षाच्या घटनेत लिहिलेल्या ध्येयधोरणांच्या विरोधात जात असताना प्रतिनिधी सभेचे आयोजन करून त्यास संमती घेण्यात आली नव्हती.
कामत – काँग्रेस आमदारासोबत अयोध्येतील राम मंदिराला भेट देणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमं होते का ?
केसरकर – मला माहित नाही.
कामत – दहा प्राचीन मंदिरांना निधी देण्याचा निर्णय झाला?
केसरकर – मला माहित नाही
कामत – एमआयडीसीत 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचा निर्णय झाला, त्याबाबत माहिती आहे का?
केसरकर – मला माहित नाही.
कामत – उद्धव ठाकरेंनी सीएम म्हणून शिवसेनेची विचारधारा बळकट केली. विशेषतः मराठी माणसाची ओळख टिकवणे, भाषा हे खरे आहे का?
केसरकर – मराठी भाषा विभागाने आपली चार महामंडळे नवी मुंबईत हलविण्याचा निर्णय झाला. नवे, सध्याचे सरकार सत्तेत आल्यावर हा निर्णय बदलण्यात आला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणारे एकही कार्यालय मुंबई बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.
कामत – २१ जून २०११ रोजीचा कथित ठराव साक्षीदार यांना दाखवण्यात यावा. (एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव)
कामत – जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, तर हा ठराव राज्यपालांना का पाठवण्यात आला?
केसरकर – एकनाथराव संभाजी शिंदे यांची महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा ठराव केला होता?
कामत – २१ जून २०२२ रोजीच्या या ठरावाच्या आधारे राज्यपालांनी ३० जून २०२२ रोजी बहुमत चाचणीचे आदेश दिले. हे खरे आहे का?
केसरकर – मला याबाबत माहिती नाही.
कामत – राज्यपालांनी २८ जून २०२२ रोजी पाठवलेले पत्र केसरकर यांना दाखवण्यात आले. २१ जून २०२१ रोजीचा ठराव राज्यपालांना पाठवण्यात आला. त्यात उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या सरकारने आपला बहुमताचा आकडा गमावला आहे, अशी राज्यपालांची धारणा झाली. हे खरे आहे का?
केसरकर – हे खरे नाही.
कामत – जून २०२२ मध्ये तुम्ही गुवाहाटीला कधी गेलात?
केसरकर – मला निश्चित तारीख आठवत नाही. पण २३ किंवा २४ जून २०२२ रोजी गेल्याचे आठवते.
कामत – तुम्ही गुवाहाटीला स्वतः च्या खर्चाने राहिलात का?
केसरकर – ही माझी वैयक्तिक माहिती आहे. ती मी उघड करू शकत नाही.
कामत – तुम्ही फ्लाईटनेची तिकिट स्वतः काढली होती का?
केसरकर – ही माझी वैयक्तिक माहिती आहे. ती मी उघड करू शकत नाही.
कामत – तुम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करत असून तुमची प्रवासाची माहिती लपवत असल्याने तुमचा हा खर्च त्रयस्थ व्यक्तीने केल्याचे म्हणता येईल का?
केसरकर – हे खोटे आहे
कामत – २०१९च्या निवडणुकीत तुमचा एबी फॉर्म कोणी सही केली?
केसरकर – मला आठवत नाही
कामत – शिवसेना राजकीय पक्षाचे अधिकृतपणे प्रतिनिधित्व करत असलेल्या अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांनी तुमच्या एबी फॉर्मवर सही केली का?
केसरकर – मला आठवत नाही
कामत – केसरकर यांना काही कागदपत्र दाखवण्यात आले. यावर तुमची सही आहे का?
केसरकर – मी २१ तारखेला कुठल्याही कागदपत्रांवर सही केलेली नाही. ही सही माझी माझ्या सही सारखी आहे.
(कामत यांचा आक्षेप, त्यांनी ही सही केल्याचे म्हटले आहे, असं कामत म्हणाले. शिंदे गटाचे वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. तुम्ही त्यांना पूर्ण करू द्या. मध्येच वाक्य तोडू नका. त्यांनी म्हटलं की त्यांच्या सही सारखी सही आहे, असं शिंदे गटाचे वकील म्हणाले.)
केसरकर – ही माझी सही आहे. पक्षाकडून अनेकवेळी वेगेवेगळ्या कागदांवर सह्या घेतल्या जायच्या आणि त्या क्रमांकासमोरच घेतल्या जायच्या. मात्र त्या काहीही मजकूर लिहिण्याआधी घेतल्या जायच्या. शिवसेना विधीमंडळ पक्ष विधानसभा सदस्यांची यादी या कागदाच्या माथ्यावर हाताने पक्षादेश लिहिले जायचे. पक्ष म्हणून मी काढताना हीच प्रक्रिया राबवली जायची. त्यामुळे कुणीही या सही केलेला कागदावर काहीही लिहू शकतो.