Gondia murder | भाऊच ठरला कर्दनकाळ, उपचाराला खर्च लागतो म्हणून संपविले, मतिमंद भावाची गळा दाबून हत्या!
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनी येथील ही ह्रदयद्रावक घटना. आईने नवीन मोटारगाडी घेण्यास पैसे दिले नाही. हा राग मनात घेऊन मोठ्या भावाने चक्क आपल्या लहान मतिमंद भावाचा गळा घोटून हत्या केली.
गोंदिया : मला गाडीसाठी पैसे हवेत म्हणून आईकडं हट्ट केला. पण, मतिमंद लहान मुलाच्या उपचारासाठी तिला पैसे हवे होते. मग, लहान भावाच्या उपचारासाठी पैसे खर्च होतात म्हणून मोठ्यानं लहान्याचा गळा आवळला. मतिमंद भावाची हत्या केली. गोंदिया जिल्ह्यात ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
आईसोबत केले कडक्याचे भांडण
मला गाडी घेण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून हेमंत डोये हा २३ वर्षीय तरुण आपल्या आईकडे तगादा लावत होता. परंतु हेमंतची आई छगनबाई डोये (वय 50) यांनी नवीन गाडी खरेदी करून देण्यास नकार दिला. कारण हेमंतचा लहान भाऊ भूवन डोये हा मतिमंद होता. त्या मतिमंद मुलाच्या डॉक्टरचा वैद्यकीय खर्च लागत होते. त्यामुळं आता पैसे नाहीत, असं तीनं सांगितलं. माझ्या भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आई पैसे देत नाही. हे हेमंतला समजत होते. माझ्या भावामुळं मला नवीन गाडी घेता येत नाही. हाच राग हेमंतच्या मनात घर करून बसला. त्याने या रागाचा वचपा काढण्याचे ठरविले. शनिवारी रात्रीच्या सुमारास हेमंतने आपल्या आईसोबत कडाक्याचे भांडण केले. मी तुला आज मारून टाकीन, अशी धमकी आपल्या आईला दिली. आई घाबरून बाजूच्या घरी झोपायला गेली. याचा संधीचा फायदा घेऊन त्यानं आपल्या मतिमंद भाऊ भूवन (वय 19 वर्षे) याचा रात्रीच्या सुमारास गळ दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.
नवीन गाडी घेण्यासाठी दिले नाही पैसे
आईने नवीन गाडी घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मोठ्या मुलाला लहान मतिमंद भावाची गळा दाबून केली हत्या. मतिमंद भावाचा वैद्यकीय खर्चास पैसे लागत असल्याने मला नवीन गाडी घेण्यास मिळत नसल्याचा मनात राग होता. आजची युवा पिढी मनात राग आल्यावर का करेल याचा काही नेम नाही, याची प्रचिती शिवणी येथील घटनेनं पुन्हा एकदा चव्हाट्यावर अली आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना सांभाळण्याची वेळ आली आहे. योग्य पद्धतीनं संस्कार करण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा काय करू शकेल, काय नाही, याचा अंदाज घेता आला पाहिजे. लहानपणापासून तसे संस्कार केले पाहिजे. अन्यथा अनर्थ घडायला काही वेळ लागत नाही.