नागपुरात मोठ्या कंपनीच्या नावे बनावट अगरबत्तीची विक्री, नक्कल केलेली सहा कोटींची अगरबत्ती जप्त
अगरबत्तीच्या व्यवसायात मोठे नाव असलेल्या एका कंपनीच्या नावावर नकली अगरबत्तीचा गोरखधंदा सुरू होता. या कारखान्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोठा छापा टाकला. यात सहा कोटी रुपयांची अगरबत्ती जप्त करण्यात आल्याची घटना घटली.
नागपूर : शहरात बनावट अगरबत्ती बनविणाऱ्या श्रीफळ अँड श्रीफळ ब्रँडवर धाड टाकण्यात आली. या धाडीत श्रीफळ गृह उद्योगाच्या दोन गोदामांवर छापे (Warehouse raids) टाकण्यात आले. ही कारवाई जिल्हा न्यायालय, दिल्ली यांच्या आदेशावरून न्यायालय आयुक्तांनी केली. बनावट मालाचा धंदा हा जगातील सर्वांत मोठ्या छुप्या उद्योगांपैकी एक आहे. हा उद्योग जलद गतीने वाढत आहे. विविध नामवंत ब्रॅण्ड (well-known brands) असलेल्या कंपन्याचे हुबेहुब उत्पादन तयार करतात. ते बाजारात विकतात. त्यातूनच देशातील अगरबत्तीचा मोठा ब्रॅण्ड असलेल्या एका कंपनीच्या देशभरात बनावट उत्पादन करणारे सक्रिय असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर कारखान्यावर पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. यावेळी सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल (confiscation of goods) जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे असे छापे यापूर्वी गुजरात, कोलकाता, ओडिशा, पाटणा येथेही टाकण्यात आले आहेत.
ग्राहकांना अस्सल उत्पादने मिळावित
भारतातील बनावट अगरबत्त्यांविरोधात लढा सुरू करण्यात आला आहे. या लढ्याचा भाग म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे आम्ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागपूरमधील कंपनीवर छापा घातला. आमच्या निष्ठावंत ग्राहकांना केवळ अस्सल उत्पादने उपलब्ध व्हावेत, हा यामागचा हेतू आहे. त्यांना हानिकारक ठरणारा बनावट माल विकून फसवणूक करू नये. यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे एमडीपीएचचे संचालक अंकित अगरवाल यांनी सांगितले.
गैरप्रकार रोखण्यासाठी कारवाई
अॅड. राजेंद्र भंसाळी म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बनावट वस्तूंची विक्री करता येत नाही. हा नियम धाब्यावर बसविण्यात आला होता. श्रीफळ या ब्रॅडची नक्कल करून उत्पादनांची विक्री केली जात होती. श्रीसफल नावाच्या ब्रँडच्या नावाचा वापर करण्यात आला. हा गैरप्रकार रोखण्यासाही ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने एमडीपीएने दिलेले पुरावे ग्राह्य धरले. त्यामुळं मोठा दिलासा मिळाला.