Nagpur Crime | रामटेकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईने आरोपीस चपलेने बदडले
रामटेकमधील एका डाटा टेक कॉम्प्युटर इंस्टिट्युटच्या संचालकानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीनं ही घटना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने संबंधित संचालकाला चपलेने चांगलाच चोप दिला. रामटेक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नागपूर : रामटेक (Ramtek) येथील डाटा टेक कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचा (Data Tech Computer Institute) संचालक राकेश मर्जिवे आहे. तो ग्राहक पंचायत शाखा रामटेकचा अध्यक्ष आहे. चौदा एप्रिल चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा त्याने विनयभंग केला. पीडित मुलीच्या आईने रामटेक बालोद्यानजवळील स्केटिंग मैदानावर आरोपीला चपलेने बडविले. त्यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनीही त्याला चोप दिला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रामटेक पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने मुलीला गुरुवारी दुपारी पाच वाजता रामटेकच्या गांधी चौकातील (Gandhi Chowk) स्टेट बँकेच्या इमारतीमधील वरच्या खोलीत नेले. तिथं त्यानं तिच्याशी लगट करून विनयभंग केला. तू नेहमी येत जा आपण येथे भेटत जाऊ, असेही म्हटले. घडलेला प्रकार पाहून मुलगी घाबरली. तिथून पळून घरी गेली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.
नागरिकांनीही केला हात साफ
आईने दुसर्या दिवशी आपल्या अल्पवयीन मुलीसोबत स्केटिंग ग्राउंडवर आरोपीला पकडले. त्याला चपलेने झोडपले. उपस्थित नागरिकांनीही राकेशवर हात साफ केले. मुलीच्या आईने रामटेक पोलीस स्टेशनला घटनेची तोंडी रिपोर्ट दिली. रामटेक पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणअन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला विशेष न्यायालयात हजर केले. एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक सीमा बेंद्रे तपास करीत आहेत.
यापूर्वीही दोन घटना
राकेश यांच्यावर 2019 मध्ये डाटा टेक कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट येथे एमएससीआयटी अभ्यासक्रम शिकायला येणार्या अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लिल चाळे केले होते. त्यावेळीही मुलीच्या नातेवाईकांनी त्याची चांगलीच धुलाई केली होती. पोलिसात गुन्हा दाखल होऊन अटकही झाली होती. दुसरी अशीच घटना 2020 साली घडली होती. या घटनेतही पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला झोडपले. पोलिसात तक्रार गेल्यावर तिथे आपसी समझोता करून प्रकरण मिटविण्यात आले होते.