NCP : शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का?; अजितदादा गटाचा बडा मंत्री म्हणाला, जयंत पाटील आमच्या…
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. जयंत पाटील यांच्या या दाव्यातील हवाच अजितदादा गटाच्या मंत्र्याने काढली आहे. या मंत्र्याने उलटा दावा करून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 19 ऑक्टोबर 2023 : अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. अजितदादा गटाचे कोणते आमदार शरद पवार यांच्या गटात सामील होणार अशी चर्चा रंगायलाही लागली. मात्र, ही चर्चा रंगण्यापूर्वीच अजितदादा गटाच्या एका मंत्र्याने मोठा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असा दावाच या नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. जयंत पाटील हे आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांचं आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं सुरू आहे. आठ आमदारांसह ते आमच्या पक्षात सामील होतील, असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील खरोखरच अजितदादा गटात जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
एकही आमदार रडत नाही
दर मंगळवारी आमच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक होत असते. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे 45 आमदार उपस्थित असतात. आमच्या गटाचे कोणी आमदार रडत आहे यात तथ्य नाही. महाराष्ट्र सरकारने अनेक कामांची स्थगिती सुद्धा उठवलेली आहे. मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळत आहे, असं अत्राम म्हणाले.
भेसळीची चौकशी सुरू
सणासुदीचे दिवस असल्याने अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज झालं आहे. चार महिन्याकरता अभियान राबवत आहोत. कुठल्याही प्रकारची भेसळ होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत. नागपुरात भेसळ युक्त तेल सापडलं. त्याची चौकशी सुरू केली. मीडियाच्या माध्यमातून तेलात भेसळ होत असल्याच्या बाबी समोर आल्या. त्याची प्रशासनाला माहिती नव्हती. पण या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दूध, मिठाईमध्ये भेसळ होणार नाही यावर लक्ष ठेवले जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ड्रग्स तस्करी संपवणार
ड्रग तस्करी हा वाईट विषय आहे. तो संपविण्यासाठी काम सुरु आहे. अधिकाऱ्यांची कमतरता होती. ती सुद्धा भरून काढल्या जात आहे. ड्रग तस्करी संदर्भात विभाग आणि गुप्त माहिती देणारे यांचं प्रमाण मोठं आहे. या संदर्भात संयुक्त कारवाईची तयारी सुरू आहे. विरोधक आरोप करत असतात. त्यांचं कामच विरोध करण्याचं आहे. आम्ही काम करत आहोत. ड्रग तस्करी संपविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.