Nagpur Crime | इंस्टावर फुलले प्रेम, प्रेयसीला घेण्यासाठी प्रियकर आला; पण, घडले भलतेच…
तिचे इंस्टाग्रामवर मुंबईतील वीस वर्षांच्या मुलासोबत गट्टी जमते. त्यानंतर तो तिला भेटायला नागपुरात येतो आणि तिला सोबत घेऊन जाताना रेल्वे पोलिसांच्या तावडीत दोघेही सापडतात.
नागपूर : ही स्टोरी आहे एका प्रेम प्रकरणाची. सोशल मीडियावर अशाप्रकारची प्रेम प्रकरणं घडतात. पण, यातील बुटीबोरीतील ही मुलगी फक्त तेरा वर्षांची आहे. तिचे इंस्टाग्रामवर मुंबईतील वीस वर्षांच्या मुलासोबत गट्टी जमते. त्यानंतर तो तिला भेटायला नागपुरात येतो आणि तिला सोबत घेऊन जाताना रेल्वे पोलिसांच्या तावडीत दोघेही सापडतात.
अशी झाली ओळख…
बुटीबोरीतील मयुरी (नाव बदलले) आठवीत शिकते. पण, या तेरा वर्षांच्या मुलीच्या हातात मोबाईल आला. इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली. इन्स्टावरून तिची आकाश नावाच्या मुलाशी मैत्री झाली. आकाश हा मूळचा वाशीम जिल्ह्यातला. कारंडा लाड येथील रहिवासी. मुंबईत एका खासगी कंपनीत काम करतो. मुंबईवरून तो तिला भेटण्यासाठी कधी-कधी नागपूरला यायचा. आईच्या लक्षात ही बाब आली. तो मित्र असल्याचं तीनं सांगितलं.
टीसीला मुलीबाबत आली शंका
मयुरी गुरुवारी घराबाहेर पडली. गणवेश घातला होता. सोबत स्कूल बॅगही होती. पण, तिने शाळेऐवजी रेल्वे स्थानक गाठले. दोघेही मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होते. टीसीनं तिकिटाबद्दल विचारणा केली. शिवाय शाळेच्या गणवेशात असल्यानं या दोघांवर शंका आली. रेल्वे सुरक्षा दलाकडं यांना सोपविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मन मोकळे केले. मुलीच्या आईवडिलांना बोलावण्यात आले. आईला मुलीचे कारस्थान पाहून धक्काच बसला.
पोलीस ठाण्यातील सैराटचा सीन
माझ्या मुलीला पळवून नेणाऱ्या आकाशची तक्रार करणार म्हणून आई हट्ट करत होती. पण, मुलगी आईला विणवणी करत होती. आई गं आकाशवर गुन्हा दाखल नको करू. मुलीच्या हट्टापायी आईने आकाशची तक्रार दिली नाही. मयुरीनं आकाशला पुन्हा भेटणार नाही, असे वचन आईवडिलांना दिले. शिवाय पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून पुन्हा मुलीला भेटायचं नाही, अशी तंबी दिली.