मनोहर म्हैसाळकर यांचं निधन, विदर्भ साहित्य संघाचे होते अध्यक्ष
विदर्भ साहित्य संघाचे मॅनेजमेंट गुरू हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे (Vidarbha Sahitya Sangh) अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर (Manohar Mhaisalkar) यांचं निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, अभ्यासक व संशोधक अशी त्यांची ओळख होती. मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. गेल्या सोळा वर्षापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
विदर्भ साहित्य संघाचे मॅनेजमेंट गुरू हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. गुरुवारी त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या नागपुरात त्यांच्या पार्थिवावर अत्यंसस्कार करण्यात येतील.
मनोहर म्हैसाळकर 2006 पासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे कार्य राज्यभर पसरविले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हैसाळकर यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मनोहर म्हैसाळकर हे साहित्याच्या क्षेत्रातील आदरनीय नाव होतं. विदर्भ साहित्य संघाच्या उत्कर्षात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या रंजन कला मंदिरचे सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
महाराष्ट्र साहित्य पुणे पुरस्कृत पहिला भीमराव मराठी साहित्य उत्कृष्ट ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार मनोहर म्हैसाळकर यांना मिळाला होता. अनेक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता.
प्राचार्य राम शेवाळकर वाड्.मयीन कार्यकर्ता पुरस्कारही मनोहर म्हैसाळकर यांना देण्यात आला होता.