Mohan Bhagwat : आता मंदिरांसाठी कोणतंही आंदोलन करणार नाही, संघाची मोठी घोषणा; शिवलिंगाबाबत मोहन भागवत म्हणाले…
Mohan Bhagwat : मोहन भागवत यांनी राम मंदिर आंदोलनाचाही उल्लेख केला. आम्ही राम मंदिराच्या आंदोलनात भाग घेतला होता. ही गोष्ट आम्ही नाकारत नाही. आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात जाऊन संघाने त्यावेळी आंदोलनात भाग घेतला होता.
नागपूर: देशात ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालेला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. या पुढे मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss) कोणतंही आंदोलन करणार नाही, अशी घोषणा मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी केली आहे. इतिहास कोणीच बदलू शकत नाही. ज्ञानवापी हा एक मुद्दा आहे. त्याचा हिंदू-मुस्लिमांशी संबंध जोडणं गैर आहे. मुस्लिम आक्रमक तर बाहेरून आले होते, असं सांगतानाच आता संघ केवळ प्रेम आणि करुणेचा प्रसार करेल. हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये प्रबळ करणार आहे, असंही भागवत यांनी सांगितलं. भागवत यांच्या या विधानाचं स्वागत केलं जात आहे. काँग्रेस (congress) नेते विजय वडेट्टीवार यांनीही भागवत यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. संघप्रमुखांच्या भूमिकेच स्वागत आहे. लोकांना, धर्मपंथांना जोडण्याची भूमिका योग्य आहे. पण संघाची ही भूमिका कायम राहिली पाहिजे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
मोहन भागवत यांनी राम मंदिर आंदोलनाचाही उल्लेख केला. आम्ही राम मंदिराच्या आंदोलनात भाग घेतला होता. ही गोष्ट आम्ही नाकारत नाही. आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात जाऊन संघाने त्यावेळी आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे संघ भविष्यात कोणत्याही मंदिर आंदोलनात भाग घेणार नाही, असं भागवत यांनी सांगितलं.
प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज काय?
आता देशात कोणताही समुदायामध्ये वाद, झगडे होऊ नयेत. भारताला विश्वगुरु बनवलं पाहिजे आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला पाहिजे, असंही ते म्हणाले. आता प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही. काही केंद्रे ही आस्थेची असतात. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर का झगडायचं? वाद का वाढवायचा? असा सवालही त्यांनी केला.
विश्वगुरू बनू या
यावेळी त्यांनी हिंदू धर्म बळकट करण्यावर जोर दिला. हिंदू धर्म अधिक बलशाली करायचा आहे. पण हे करताना आपण घाबरायचं नाही आणि कुणालाही घाबरवायचं नाही. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भारताचं धोरण योग्यच
यावेळी त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या युद्धावरही भाष्य केलं. युक्रेनवर रशियाने हल्ला केला. या युद्धात भारताने जी भूमिका घेतली, ती संतुलित आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या धोरणाचं स्वागत केलं. आपण शक्तीसंपन्न असलं पाहिजे हेच रशिया-युक्रेन युद्धाने दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.