Corona Update : 11 जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, रुग्णसंख्येतही मोठी घट!
विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना (Nagpur Corona) नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
नागपूर : विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना (Nagpur Corona) नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर विदर्भात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा हे जिल्हे येतात. या सर्वच जिल्ह्यांमध्ये आता कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे.
नागपूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात पाच रुग्ण सापडले, मात्र ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. सध्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात 110 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 45 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात 5 हजार 670 चाचण्या झाल्या. त्यापैकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
नागपुरातील 525 मुलांना लसीचे दोन्ही डोस, साईट इफेक्ट नाही
नागपूरात 2 ते 18 वयोगटातील 525 मुलांवर लसीची चाचणी झालीय. या 525 मुलांना लसीचे दोन्ही डोस दिले. मुलांमध्ये कोणताही साईडइफेक्ट आढळून आलेला नाही. कोव्हॅक्सिनची ट्रायल यशस्वी झाली असून, आता अंतिम निष्कर्षाची प्रतिक्षा आहे, असं बालरोगतज्ञ डॉ. वसंत खडतकर म्हणाले.
दुसऱ्या लाटेत हाहाकार, तिसऱ्या लाटेसाठी तयारी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्हयात हाहाःकार उडाला होता. रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नव्हती, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 10 रुग्णवाहिका
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी दहा रुग्णवाहिकेची भर पडलीय. नवीन रुग्णवाहिका जिल्हा विकास निधी तसेच खनिज विकास निधी अंतर्गत देण्यात आल्याय.
संबंधित बातम्या
चांगली बातमी : लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार, ‘या’ महिन्यापर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध?
Nagpur corona : नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात शून्य मृत्यू