नागपूर मनपाचा प्रभाग आराखडा आज प्रसिद्ध होणार; कशा असतील आरक्षणाच्या जागा
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज निवडणूक आयोगातर्फे प्रभागांच्या सीमांचे प्रारूप प्रकाशित करण्यात येणार आहे.
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) 28 जानेवारीच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी एक फेब्रुवारी 2022 रोजी मनपा च्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत (Administrative building), सिव्हिल लाईन्स आणि दहा झोनल कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (Three-member ward system) होणार आहे. प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास त्या एक ते चौदा फेब्रुवारीदरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालय सिव्हिल लाईन्स किंवा संबंधित क्षेत्रीय (झोन) कार्यालय येथे जमा करावे. हरकती व सूचना दाखल करण्याऱ्या नागरिकांना सुनावणीकरीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाचे पत्रानुसार, 28 जानेवारी अन्वये आरक्षणाची सोडत नंतर काढण्यात येणार आहे.
अशा असतील आरक्षणाच्या जागा
नागपूर महापालिकेत एकूण 156 नगरसेवक निवडूण येतील. महिला आरक्षण 78 जागा, अनुसूचीत जाती 31, अनुसूचीत जाती महिला 12, अनुसूचित जमाती 12, तर अनुसूचीत जमाती महिला सहा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सामान्य वर्गातील महिलांसाठी 56 जागा आरक्षित असतील.
ओबीसी आरक्षण सध्या वगळले
38 प्रभागांऐवजी आता 52 प्रभाग होतील. सध्याच्या नगरसेवकांच्या संख्येतही पाचने भर पडणार आहे. आता 151 नगरसेवक आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 2011 च्या लोकसंख्येच्या आधारावर शहराची लोकसंख्या 24 लाख 47 हजार 494 ऐवढी निर्धारित केली आहे. 2017 च्या निवडणुकीत हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात आलाय. 26 फेब्रुवारीला सुनावणी व अंतिम आराखडा दोन मार्चला जाहीर होणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये आरक्षणाचा ड्रा काढण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण तूर्त वगळण्यात आले आहे. प्रभाग नेमका कुठपर्यंत आले. याचे प्रारूप आज स्पष्ट होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन नकाशा उपलब्ध होणार आहे.