पुन्हा येईनचा व्हीडिओ डिलीट करणं म्हणजे पुन्हा न येण्याचेच संकेत; विजय वडेट्टीवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हीडिओ शेअर अन् तासाभरात डिलीट करण्यात आलं. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.
गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नागपूर | 23 ऑक्टोबर 2023 : देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या निवडणुकीवेळी मी पुन्हा येईन असा नारा दिला. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आत पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा होतेय. काल भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हीडिओ शेअर करण्यात आला. त्यानंतर पुढच्या तासाभरात तो डिलीट करण्यात आला. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. हे ट्विट सहज केलं नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
पुन्हा येणार असं ट्विट करत असतील आणि ते तासाभरात ते डिलीट करत असतील. तर मी पुन्हा येऊ शकतं नाही, हे त्यांना माहिती असल्याचंच हे लक्षण आहे. एक बाशिंग बांधून तर दोन जण तयार आहेत. यांची तर सत्ता येणार नाही तरीही हे नवरदेव का होऊन बसत आहेत? आताच सरकार केवळ अध्यक्षांच्या भारोश्यावर आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल. आम्हाला कुणी रोखू शकणार नाही. या ट्विटवरून काहीतरी शिजत आहे. हे सहज केलेलं ट्विट आहे, अस मला वाटत नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
मराठा आरक्षणावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. पूर्वी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून नव्हता. आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना ते नकार देत आहे. आज जी परिस्थिती आहे त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरोशावर मराठ्यांना शब्द दिला. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवस सरकारवर भरोसा का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग? असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.