नवे वर्ष हे नवे संकल्प, नवी उमेद, नवी आशा घेऊन येते. नागपूर ही राज्याची उपराजधानी. याठिकाणी नव्या वर्षाचं स्वागत करायचं असेल काही ठिकाणी नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. कोणती ठिकाणं आहेत ती आपण इथं पाहणार आहोत. त्यात गणेश टेकडी मंदिर, साई मंदिर, स्वामीनारायण मंदिर, अंबाझरी जैवविविधता उद्यान आणि युवकांचं फेव्हराईट स्थळ म्हणजे फुटाळा. चला तर मग…
गणेश टेकडी मंदिर : विदर्भाच्या अष्टविनायकाचा पहिला मान म्हणजे नागपूरचे गणेश टेकडी. नागपूरवासियांचे हे आराध्य दैवत. मध्यवर्ती रेल्वेस्टेशनला अगदी लागून. गणेशाच्या मूर्तीच्या पाठीमागे भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला आहे. सचिन तेंडूलकर नागपूरला आले की गणेश टेकडीचे दर्शन घेतात. मग, शहरात राहून तु्म्ही का बरं जाऊ शकत नाही दर्शनाला…
साई मंदिर : शिर्डीच्या धर्तीवर नागपुरात साई मंदिर हवे म्हणून भक्त सरसावले. त्यांनी शिर्डीच्या साईमंदिरासारखी मूर्ती स्थापन केली. वर्धा मार्गावरील विवेकानंद नगरात असलेल्या या मंदिराला भाविक नवीन वर्षाला भेट देतात. मुख्य मार्गावर असल्यानं नेहमी या ठिकाणी भक्तांची नेहमी वर्दळ असते. या मंदिराचे विश्वस्त नगरसेवक आहेत.
स्वामीनारायण मंदिर : वाठोडा रिंगरोडवर हे स्वामीनारायण मंदिर आहे. या मंदिरात भेट द्यायची असेल, तर सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठ अशी वेळ आहे. सकाळी-संध्याकाळ आरती होते. मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रेन पार्क तयार करण्यात आली आहे. भक्तीमय वातावरणात बालकांवर संस्कार केले जातात. संध्याकाळी या मंदिरात रोषणाई केली जात असल्यानं आल्हाददायक वातावरण असते.
अंबाझरी जैवविविधता उद्यान : अंबाझरी तलावाच्या बॅकवॉटरच्या भागात हे अंबाझरी जैवविविधता उद्यान आहे. सुमारे सातशे एकर जागेवर हे उद्यान आहे. वेटलँड आणि ग्रासलँड हे याठिकाणाचं वैशिष्ट्ये. विविध पक्ष्यांचं हे माहेरघरच. शहराला लागून असलेल्या या उद्यानात वॉकिंग ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय सायकलिंगही करता येते. नवर्षासाठी तर ही खास भेट आहे, असंच समजा.
फुटाळा तलाव : फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणार एक तलाव. यास तेलंगखेडी तलाव असंही म्हणतात. भोसले राजे येथे उन्हाळ्यात येत असत, असं म्हणतात. पण, आता हे लव्हर्स पॉइंट झालंय. चलती का फुटाळा, असं युवक म्हणतात. नववर्ष असो की, सरत वर्ष इथं तरुणांची गर्दी दिसते ती एन्जाय करायला.