नागपुरात electric वाहनं हवीत तर जरा थांबा, एक ते तीन महिने वाट पाहा, बुकिंग करून ठेवा
नागपुरात इलेक्ट्रिक वाहनांची चांगलीच मागणी आहे. पण, त्या मानाने वाहनं उपलब्ध नाहीत. त्यामुळं इलेक्ट्रिक बाईक हवी असल्यास एक महिना, तर इलेक्ट्रिक कार हवी असल्यास तीन महिने थांबावे लागत आहे. त्यासाठी आधी बुकिंग करून ठेवावी लागत आहे.
नागपूर : पेट्रोलने शंभरी केव्हाच पार केली. डिझेल शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम म्हणून इंधन दरवाढीची शक्यता आणखी व्यक्त केली जात आहे. त्यावर पर्याय म्हणून लोकं इलेक्ट्रिक वाहनांकडं (Electric vehicles) पाहत आहेत. नागपुरात पेट्रोल आणि डिझेलला (petrol and diesel) पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बाइककडं नागरिकांचा कल आहे. इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा आणि टुरिस्ट कॅबची मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी वाट पाहावी लागत आहे. जास्त मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीला जास्त मागणी आहे. नागपूर शहरात जवळपास बारा चार्जिंग स्टेशन आहेत. नव्याने दहा चार्जिंग स्टेशन सुरू होणार असल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन (charging stations) हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. काहींनी स्टेशनअभावी कारची खरेदी केली नाही. शहरातील बहुतेक सर्वच भागात चार्जिंग स्टेशन असावेत, अशी ग्राहकांची मागणी आहे.
जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या
नागपूर जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या खालीलप्रमाणे आहे. नागपूर जिल्ह्यात दुचाकी -961 , कार -205, टुरिस्ट कॅब -256 आहेत. शिवाय इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा -3024, डिलिव्हरी व्हॅन -56 असे एकूण 4 हजार 502 इलेक्ट्रिक वाहनं आहेत. या संख्येत आता वाढही झाली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत.
चार्जिंग करा नि चालवा
नामांकित कंपनीचे दुचाकी वाहन खरेदी करा. पेट्रोल, डिजेलच्या दरवाढीचा ताण राहणार नाही. घरी तीन तासातच गाडीचे चार्जिंग होते. डिजेल दरवाढीमुळे आर्थिक बचतीचा पर्याय म्हणून इलेक्ट्रिक चारचाकी खरेदी केली. एका चार्जिंगमध्ये शंभर किमीपेक्षा जास्त अॅवरेज मिळतो. आर्थिक फायदा होतो, असं इलेक्ट्रिक वाहन चालविणारे सांगतात. बाजूला इलेक्ट्रिक वाहन दिसले की, आपल्याकडंही ते असावं असं वाटतं. पण, हे खरेदी करण्यासाठी आधी बुकिंग करावं लागेल. तरच ते मिळेल, अन्यथा वाट पाहण्यात वेळ निघून जाईल. तोपर्यंत पेट्रोलचा भूर्दंड बसेल.