Video-Nagpur MNS | विदर्भात मनसेला धक्का; प्रदेश उपाध्यक्ष वांदिले बांधणार हाताला घड्याळ!
अतुल वांदिले यांच्यासह जवळपास 30 ते 40 कार्यकर्ते हे मुंबईत होत असलेल्या प्रवेश सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वांदिले म्हणाले.
नागपूर : विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका आहे. मनसेचे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले (Atul Vandile) राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अतुल वांदिले हे मनसेचा विदर्भातील ओबीसी चेहरा आहेत. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. हा मनसेला विदर्भात मोठा धक्का मानला जातो. आज ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का असून राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.
आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
अतुल वांदिले म्हणाले, मनसे पक्ष विदर्भात वाढला नाही ही खंत आहे. आमची नाराजी राज ठाकरे यांच्यावर नाही. तर नाराजी ही दुसऱ्या फळीतील नेत्यावर आहे. दुसऱ्या फळीतील नेते कधीच आमच्याकडे दौरे करत नाहीत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम दिला जात नव्हता. मग अशा ठिकाणी थांबून उपयोग नाही, अशी कार्यकर्त्याची भावना होती. त्यामुळं राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचं वांदिले म्हणाले. अतुल वांदिले यांच्यासह जवळपास 30 ते 40 कार्यकर्ते हे मुंबईत होत असलेल्या प्रवेश सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वांदिले म्हणाले.
कोण आहेत अतुल वांदिले?
अतुल वांदिले हे तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अतुल वांदिले हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मागील अनेक वर्षांपासून पक्षात काम करताना संघटना वाढीसाठी प्रयत्न केले. पण मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खालची फळी हे पक्ष वाढीसाठी मदत करत नव्हते. त्यांनी हिंगणघाट विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. पूर्व विदर्भात काम करत असताना पक्षातील पदाधिकारी यांचीही मागणी होती. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि जनतेचा कौल लक्षात घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.