Nana Patole | समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट; नाना पटोले म्हणतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही
भाजप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतो. त्यासाठी रोज कोट्यवधी रुपये खर्च करतो. काँग्रेस आता या सोशल मीडियाला टक्कर देणार आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. यातून काँग्रेसचा सोशल मीडिया आणखी स्ट्राँग होईल, असंही त्यांनी सांगितलं.
नागपूर : कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकत मुंबई एनसीबीनं (Mumbai NCB) मोठी कारवाई केली होती. मुंबई एनसीबीचे त्यावेळचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन खानला दोषी धरत कारवाई केली. पण, आता आर्यन खान निर्दोष असल्याचं सिद्ध झालंय. एनसीबीनं आर्यन खानला क्लीन चिट दिली. आता समीर वानखेडेवर काय कारवाई होणार, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले यांना नागपुरात विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग हा सातत्याने होत आहे. आर्यन खानबाबतही काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण, वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण वानखेडे हा केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) पोपट होता. या पोपटावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. हे आपल्याला पुढच्या काळात दिसून येईल.
मी या प्रकरणाशी संबंधित नाही
आर्यन खानला जेलमध्ये दिवस काढावे लागले. त्याच्यावर ड्रग्स सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, आता मी या विषयाशी संबंधित नाही. त्यामुळं आर्यन खानला निर्दोष सोडल्यानंतर मी या प्रकरणाशी संबंधित नाही. त्यामुळं यावर भाष्य करू शकत नाही, असं समीर वानखेडे यांनी सांगितलंय. त्यामुळं त्यावेळी आर्यन खानला जे सोसावं लागलं त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सोशल मीडियाचे प्रशिक्षण
देशासमोर बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करते. त्याला करारा जबाब काँग्रेसला द्यावा लागेल. यासाठी काँग्रेसनं राष्ट्रीय स्तरावरील सोशल मीडियाचं दोन दिवसीय प्रशिक्षण नागपुरात ठेवलं. या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचं प्रशिक्षण देत आहोत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे. देशाची संविधानिक व्यवस्था वाचविणं काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यासाठी हे सर्व करत असल्याचं नाना पटोले म्हणाले. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. भाजप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतो. त्यासाठी रोज कोट्यवधी रुपये खर्च करतो. काँग्रेस आता या सोशल मीडियाला टक्कर देणार आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. यातून काँग्रेसचा सोशल मीडिया आणखी स्ट्राँग होईल, असंही त्यांनी सांगितलं.