नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळा, सातव्या आरोपीला अटक, तीन मार्चपर्यंत कोठडी
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा प्रकरणात लिपिकाला अटक करण्यात आली. वरिष्ठ लिपीक सानीस गोखे याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे.
नागपूर : मनपातील स्टेशनरी खरेदीमध्ये (Stationery Procurement ) आर्थिक तफावत आणि बोगस स्वाक्षर्या आढळल्या. त्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी संजय दादाराव चिलकर यांनी सदर ठाण्यात तक्रार दाखल केली. आता महापालिकेतील 67 लाख रुपयांचा स्टेशनरी घोटाळा चांगलाच गाजत आहे. आर्थिक गुन्हे शाखा (Economic Crime Branch) याचा तपास करत आहे. नागपूर स्टेशनरी घोटाळ्यात लिपीक सानीस गोखे याचा घोटाळ्यात सहभाग असल्याचं तपासात पुढे आलं. अटक करण्यात आलेला आरोपी हा सामान्य प्रशासन विभागातील (General Administration Department) आहे. या लिपिकाचा सहभाग सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गोधनी येथील गोखे याला न्यायालयाने तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चौकशीत आढळली तफावत
या प्रकरणातील तपासात पोलिसांनी मनपा कार्यालयाचे प्रभारी भांडार प्रमुख प्रशांत भातकुलकर यांची चौकशी केली. त्यावेळी वित्त विभाग व भांडार विभागात तफावत आढळली. वित्त व लेखा विभागाकडून देयके मंजूर असलेल्या 41 नस्तींमध्ये तफावत आढळली. आरोग्य विभागाकडून प्रावधान न घेता बोगस नस्त्या व देयके बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. देयके परस्पर वित्त विभागास सादर करण्यात आली. सुदर्शन पेपर्स कन्व्हर्टिंग, फर्मचे मालक कोलबा साकोडे, मनोहर साकोडे अॅण्ड ब्रदर्स, गुरुकृपा स्टेशनर्स अॅण्ड प्रिंटर्स, मालक मनोहर साकोडे, स्वस्तीक ट्रेड लिंकचे मालक अतुल साकोडे, एस. के. एण्टरप्राईजेस फर्मच्या मालक सुषमा साकोडे या पाचही आरोपींनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक प्रकरणात आरोपीला कोठडी
स्वतःच्या फायद्याकरिता वित्त व लेखा विभागाकडून नस्ती संबंधित देयके मंजूर केली. 67 लाख 8 हजार 630 रुपयांची बिले मंजूर करून नागपूर आरोग्य विभागाची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यातील आरोपी सनीस मूलचंद गोखे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.