एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती कधी? शिंदे गटाच्या आमदाराच्या उत्तराने सुनावणीवर परिणाम?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आता शिंदे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उलटसाक्ष नोंदवण्याच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना काही प्रश्नांचे उत्तरे थेट आणि स्पष्टपणे देता आले नाहीत. त्यांनी काही प्रश्नांवर हो किंवा नाही, असंच उत्तर देणं अपेक्षित असताना सविस्तर भूमिका मांडली. तर काही प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडायची गरज होती त्यावर आपल्याला माहिती नाही किंवा लक्षात नाही, असं उत्तर दिल्याचं बघायला मिळालं आहे.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 7 डिसेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर आज शिंदे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम आज सुरु झालं. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांची उलटसाक्ष नोंदवली. सुनावणीच्या सुरुवातीला दिलीप लांडे वकिलांच्या प्रश्नावर हो किंवा नाही, असं उत्तर अपेक्षित असताना लांडे सविस्तर उत्तर देत होते. यावरुन विधानसभा अध्यक्षांनी दोन-तीन वेळा त्यांना मिश्किल टोला देखील लगावला. त्यामुळे सुनावणीला उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यावर लांडे यांनी दिलेलं उत्तर सुनावणीसाठी महत्त्वाचं आहे. देवदत्त कामत यांच्याकडून लांडे यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्यावर लांडे यांनी आपली भूमिका मांडली.
नेमके सवाल-जवाब काय?
कामत – आपण शपथपत्र सादर केलं आहे ते आपल्या वतीने सादर केले आहे की एकनाथ शिंदेच्या वतीने?
दिलीप लांडे – माझी जी वस्तू स्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे
कामत – अपात्रता याचिका क्रमांक १ ते १६ जी बघितली त्यात आपण स्वतः पार्टी नाही, पण आपण जी साक्ष दिली ती स्वतः ला साक्ष द्यायची आहे म्हणून दिली की एकनाथ शिंदेच्या वतीने?
लांडे – १ ते १६ या याचिकेत माझं नाव नाही, असं आपण मला सांगितले. पण जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर मांडलं. साक्ष मी दिली त्यामुळे मी स्वतः च्या वतीने दिली. साक्ष एकनाथ शिंदे यांच्यावतीने नाही तर स्वतःच्या वतीने साक्ष देत आहे
कामत – आपण याचिका क्रमांकात १ ते १६ मध्ये पक्षकार नाही आहात. मग आपण ती साक्ष एकनाथ शिंदेच्या वतीने देत आहात का?
लांडे – तीच परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे मी जनतेसमोर मांडले.
देवदत्त कामत – आपण एकनाथ शिंदेंच्या वतीने साक्ष देत नाहीत, आपल्याला याबाबत काय म्हणायचे आहे? हे खरे आहे की खोटे?
दिलीप लांडे – एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आहे ते मी सांगत आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमध्ये साक्ष देत आहे. याचा अर्थ मी त्यांच्या वतीने देत आहे.
कामत – मी आपल्याला अस सांगू इच्छितो की आपण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल साक्ष देत नाही आहात. हो की नाही?
लांडे – मी परिस्थिती मांडत आहे
कामत – फक्त हो की नाही सांगा
लांडे – काय हो की नाही?
विधानसभा अध्यक्षांनी लांडेना प्रश्न समजवून सांगितला.
लांडे – मी एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमध्ये साक्ष देत आहे, याचा अर्थ म्हणजे त्यांच्या वतीने देत आहे
देवदत्त कामत – शिवसेना राजकीय पक्षाचे तुम्ही कधीपासून सदस्य आहात?
दिलीप लांडे – बईत आल्यापासून.. १९८३-८४ साली मी मुंबईत आलो.
देवदत्त कामत – आपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद ११मध्ये तुम्ही म्हटले आहे की “तुम्ही पक्षाच्या सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहात. माझ्या पक्षाने निर्देश दिले त्यांच्या विरोधात काम केले नाही. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर २००५ मध्ये बाळासाहेब जीवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला?
लांडे – मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, आता मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.
विधानसभा अध्यक्ष यांनी यावेळी मिश्किल टीप्पणी केली. “शिवाजी पार्कच भाषण देऊ नका”, असं विधानसभा अध्यक्ष मिश्किलपणे म्हणाले.
दिलीप लांडे – “बाळासाहेब यांच्या नावापुढे सरसेनापती शिवसेना प्रमुख उल्लेख करा”, अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली.
देवदत्त कामत – तुम्ही २००५ साली शिवसेना पक्ष सोडला होता की नाही?
दिलीप लांडे – शिवसेनेत होतो.
देवदत्त कामत – तुम्ही मनसे पक्षात सामील झाला होता का? तुम्ही पूर्वी कधी त्यांच्या तिकिटावर कुठली निवडणूक लढला आहात का?
दिलीप लांडे – मी मनसोक्त पक्षाचा नेता होतो. मी मनसे पक्षातून निवडणूक लढवली आहे.
देवदत्त कामत – बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता अणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?
(शिंदे गटाच्या वकिलांचा आक्षेप, ‘या प्रश्नाला काहीही आधार नाही’)
दिलीप लांडे – मला यावर काहीही बोलायचे नाही.
देवदत्त कामत- तुम्ही योग्य उत्तर देत नाही.
शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दित खडाजंगी
ठाकरे गटाच्या वकिलांचा आक्षेप, साक्षीदार योग्य उत्तर देत नाही. शिंदे गटाकडून मात्र नकार, ते उत्तर देत आहेत, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा
देवदत्त कामत – याआधीच्या प्रश्नात मी सुचवले ते खरे होते, म्हणून तुम्ही उत्तर टाळत आहात का?
दिलीप लांडे – मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली आहे. माझे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत माझ्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
देवदत्त कामत – बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का?
दिलीप लांडे – योग्य नाही. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी संगनमत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्त्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिकवण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
देवदत्त कामत – शिवसेना राजकीय पक्षाने सध्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे हे योग्य आहे का?
दिलीप लांडे – आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी
विधानसभा अध्यक्ष -आपण फक्त शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहणे योग्य की अयोग्य हे सांगा.
लांडे – माझे मत मला मांडू द्या
अध्यक्ष – तुम्ही नीट मांडा, नाहीतर मला ते मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना भिरभिरतंय
सभागृहात हसू उमटले
लांडे – आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना भाजपाची युती केली होती आणि अनेक वर्षे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्त्वाचे सरकार आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर सरकार होते. ज्या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचे विचार आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदुस्थान मधील राजकीय पक्षाला मान्य होते, अशा हिंदुत्ववादी लोकांबरोबर देशाची सेवा करणे हे योग्य आहे.
देवदत्त कामत – शिवसेना आणि बाळासाहेब यांची विचारधारा राष्ट्रवादी सोबत युती करण्याची परवानगी देते का?
दिलीप लांडे – या प्रश्नाचे उत्तर मी आता दिले आहे
कामत – राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला विरोध आहे असं म्हटलं तर ते योग्य राहील का?
लांडे – मला सविस्तर उत्तर द्यावं लागेल
पुन्हा एकदा सभागृहात हशा.
अध्यक्ष – तुम्ही उत्तर द्या पण तुम्ही आतापर्यंत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चार वेळा सांगितलं आहे.
लांडे- आता वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना भाजपच्या विचारांशी सहमत होऊन राष्ट्रवादी सहभागी झाली आहे.
अध्यक्ष- मोजकी उत्तर द्या
पुन्हा एकदा सभागृहात मोठ्याने हशा
देवदत्त कामत – शिवसेनेच्या घटनेत किंवा बाळासाहेबांच्या शिकवणीत निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर सत्तास्थापनेसाठी युती करू नये असं कुठेही नाही.
दिलिप लांडे – बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहे की, “आयुष्यात काँग्रेसशी कधीही युती करणार नाही. अशी वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना पक्षाचे दुकान बंद करेन” हे बाळासाहेबांचे विचार आहेत.
कामत – आमदारांचा एखादा गट विरोधीपक्ष असणाऱ्या राजकीय पक्षाशी युती करू शकत नाही.. यावर आपलं काय मत आहे?
लांडे – ज्यांच्यासोबत आपण निवडणुक लढवली. अशा हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करू शकतो
कामत – एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत 30 जून 2022 ला सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे का
लांडे – होय
कामत – अनुक्रमांक 32 वरील जी सही आहे ती आपली आहे का?
लांडे – होय
कामत – सही करण्याअगोदर आपण हे वाचून आणि समजून घेतल का?
लांडे – होय
कामत – आपण या मजकुराशी सहमत होता म्हणून यावर सही केली का
लांडे – होय
कामत – या कागद पत्रात जो ठराव दिलेला आहे त्यानुसार शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होत का?
दिलीप लांडे – सदर बैठक विधिमंडळ गटनेता निवडी बाबत होती आणि महाराष्ट्र विधिमंडळ कायद्याप्रमाणे निवडून आलेल्या त्या पक्षाच्या लोक प्रतिनिधींना गटनेता निवडीचा अधिकार असतो. त्यामुळे सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारानी आदरणीय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली होती
कामत – विधिमंडळ पक्षाचा सदस्य, नेता आणि प्रतोद निवडतात अशी आपली भूमीका आहे का?
लांडे – विधीमंडळ पक्षाचा नेता निवडायचे काम निवडून आलेले आमदार करीत असतात. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवतात प्रतोद कोण ते
कामत – राजकीय पक्ष ठरवत असतो की विधिमंडळाचा नेता आणि प्रतोद कोण हे मी तुम्हांला सांगू इच्छितो. तर यावर तुमचं मतं काय?
लांडे – निवडून आलेले आमदारचं ठरवत असतात की विधिमंडळाचा नेता कोण
देवदत्त कामत – प्रतोद संदर्भात आपलं काय म्हणणं आहे?
दिलीप लांडे – माझ्या माहितीप्रमाणे प्रतोद निवडण्याचा अधिकार हा गटनेत्याचा असतो.
कामत – एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षाच्या नेतेपदी कधी नियुक्त करण्यात आली?
लांडे – मला आठवत नाही.
देवदत्त कामत – पान क्रमांक २५ ते २८ हे दिलीप लांडे यांना दाखवण्यात यावे.
या कागदपत्रांना शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. या कागदपत्रांची साक्षीदारांना माहिती नाही. त्यामुळे या कागदपत्रांवर प्रश्न विचारण्यात येऊ नये, असं शिंदे गटाचे वकील म्हणाले. पण त्यावर ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी हरकत घेतली. या कागदपत्रांबाबतचा मुद्दा रेकॉर्डवर घेण्यात यावा, अशी मागणी कामत यांनी केली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांची संमती दिली.
शिंदे गटाचे वकील : जोपर्यंत आमच्याकडून हा कागदपत्रे तपासली जात नाहीत, तोपर्यंत त्यावर आमच्या साक्षीदारास प्रश्न विचारण्यात येऊ नये
कामत – उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना या राजकीय पक्षाचे नेते म्हणून शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत जी २३ जानेवारी २०१८ ला झाली तेव्हा नियुक्ती केली का ?
लांडे – मला माहीत नाही
कामत – आपल्या मते एकनाथ शिंदे हे शिवसेना या पक्षाच्या नेतेपदी होते की नव्हते?
लांडे – मी शिवसेना पक्षात आल्यानंतर मला माहीत झाले
देवदत्त कामत – याआधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटला की शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला कळाले की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. मग आपण शिवसेनेत प्रवेश कधी केला?
दिलीप लांडे – फेब्रुवारी किंवा मार्च २०१८ नंतर
कामत – जेव्हा आपण प्रवेश केला तेव्हा इतर नेते कोण होते हे आपल्याला माहित होते का?
लांडे – माझ्या माहितीप्रमाणे ९ नेते होते. सर्वांची नावे तोंडपाठ नाही