राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक, कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते, कोण आहेत कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला.
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Pradesh Youth Congress) संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत (Kunal Raut) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. युवक काँग्रेसतर्फे अद्याप अध्यक्षपदी नियुक्तीची औपचारिक घोषणा केली नसली तरी त्यांची या पदावर निवड जवळपास पक्की मानली जात आहे. त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी व युवक काँग्रेसच्या सदस्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. या निवडणुकीसाठी युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी (For the post of State President) चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीकरिता प्रदेशाध्यक्ष पदाकरिता 14 उमेदवार रिंगणात होते. 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सदस्य बनताच ऑनलाईनरीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मत द्यावे लागले होते. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
कुणाल राऊतांना मिळाली विक्रमी मते
काल जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली आहेत. राऊत यांनी अनेक दिग्गज उमेदवारांना मागे टाकले आहे. राऊत यांनी युवकांचा विश्वास जिंकत निवडणुकीत मोठ्या फरकाने मते मिळवली. ही मोठी बाब असल्याचे बोलले जात आहे. कुणाल यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली. ऑनलाईन मतांची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी नागपूर येथील बेझनबाग जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचं वाटप करून आनंद साजरा केला.
कोण आहेत कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल – कुणाल राऊत
युवक काँग्रेसच्या युवा मतदारांनी व राज्यातील युवा शक्तीनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करून दाखवेल, अशा शब्दात कुणाल राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचा आणि माझ्या निवडणुकीत मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील,अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास मी जातीयवादी, भांडवली शक्ती आणि मोदी सरकारविरुद्ध जनतेत रान उठवेलं, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.