Sudhir Mungantiwar : ‘मी तुम्हाला मनापासून…’, महायुतीच्या जागा वाटपावर सुधीर मुनगंटीवारांचं महत्त्वाचं विधान
"आपला महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र घडवण्याची क्षमता डबल इंजिन सरकारमध्ये आहे. केंद्रात मोदीजींच सरकार आणि इथे दुर्देवाने मविआच सरकार आलं, तर महाराष्ट्राच न भरुन येणारं नुकसान होईल" असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने आज विदर्भातील भाजपाचे प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना महत्त्वाच राजकीय भाष्य केलं. “हा निवडणुकीचा शंखनाद, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी अमितभाई येत आहेत. महाविकास आघाडी मायावी, दृष्ट रुप घेऊन येत आहे. नरेटिव्ह सेट करत आहेत, अतिशय खोटारडा प्रचार करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही. जे काँग्रेसचे लोक लाडकी बहिण योजनेला विरोध करतात, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली तर यांना करंट लागतो, तो नकाब फाडण्यासाठी ही संवाद यात्रा आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“अमित शाह येतात, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होतं. त्यांची राजकीय मांडणी मुद्देसूद, तर्कसंगत असते. विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांना बोलावण्यात आलं आहे. त्याशिवाय विदर्भातील काही प्रमुख नेत्यांशी अमित शाह पुन्हा व्यक्तीगत संवाद साधतील” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही किती तयार आहोत, त्याचा आढावा बैठकीतून घेण्यात येईल, असं मुनगंटीवार म्हणाले.
‘…तर महाराष्ट्राच न भरुन येणारं नुकसान’
“लोकसभेला मताधिक्क्य कमी झालं होतं. ते मताधिक्क्य वाढवाव लागेल. सरकार आणावं लागेल. माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र घडवण्याची क्षमता डबल इंजिन सरकारमध्ये आहे. केंद्रात मोदीजींच सरकार आणि इथे दुर्देवाने मविआच सरकार आलं, तर महाराष्ट्राच न भरुन येणारं नुकसान होईल” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
‘मी तुम्हाला मनापासून सांगतोय…’
“लोकसभा क्षेत्र नव्हे, तर बूथ लेव्हलच अमितभाईंच प्लानिंग असणार. उत्तर प्रदेशात त्यांनी हे केलं होतं. मध्य प्रदेशात अमित भाईंनी लक्ष दिलं, तिथे 230 पैकी 165 जागा जिंकल्या. अमितभाई बूथ लेव्हलच मायक्रोप्लानिग करतात” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जागा वाटपाच्या मुद्यावर मुनगंटीवार म्हणाले की, “मविआत ज्या प्रमाणे अडचणी आहेत, तशा आमच्यातही काही अडचणी असतील असं वाटत असेल, पण अशी काही धुसफूस नाहीय. उत्तम पद्धतीने जागा वाटप पूर्ण होतय. मी तुम्हाला मनापासून सांगतोय, बूम आहे म्हणून बोलत नाहीय, अतिशय चांगल्या वातवरणात जागावाटप झालय”