तीन मुले खेळायला गेली, संध्याकाळ झाली तरी घरी परतले नाही, अखेर कारमध्ये सापडले त्यांचे मृतदेह
नागपूर पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातली ही घटना. शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली.
गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : टेका येथील फारुकनगरग्राऊंडवर तीन चिमुकले खेळायला गेली. काल सायंकाळी ते घरी परतले नसल्याने घरच्यांची चिंता वाढली. तौफिक फिरोज खान (वय ४ वर्षे), आलिया फिरोज खान (वय ६ वर्षे) आणि आफरीन ईरशाद खान (वय ६ वर्षे) हे तिघेही दिसले नव्हते. पोलिसांत तक्रार करण्यात आली. कुणाला दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केले होते. घराबाहेर गेल्यानंतर कारमध्ये गेले. तिथं डिकी लागल्यामुळे ते आतमध्ये श्वास गुदमरून मरण पावले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
त्या तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले
नागपूर पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातली ही घटना. शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तीनही चिमुकल्यांचे मृतदेह आज आढळले. मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे.
रात्र झाली तरी मुले घरी आले नव्हते
शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरीही मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासणे सुरु केले.
वाहनात बेशुद्धावस्थेत सापडली मुलं
मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधता आले नाही. पोलिसांनी अपहृत तीनही मुलांचे छायाचित्र आणि माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत नागरिकांना आवाहन केले होते. मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरु केले.
तीनही मुलांचे वय लक्षात घेता ते जास्त दूर गेले नसल्याचे पोलिसांना खात्री होती. त्यात रात्री आठ वाजता एका वाहनात तीनही मुले बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.