Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, पोलीस आणि समाजातील अंतर कमी व्हावे
स्टॉल भेटीनंतर विद्यार्थ्यांची संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी हर घर तिरंगा या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरावर तिरंगा उभारण्याचे आवाहन केले.
नागपूर : पोलीस समाजाच्या रक्षणासाठी काय काय करते, याची माहिती मुलांच्या माध्यमातून समाजापर्यंत जात आहे. हे अतिशय सकारात्मक आहे. पोलीस आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी अशा माहितीचे प्रदर्शन उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नागपूर येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत पोलीस भवनामध्ये (Police Bhawan) नागपूर पोलिसांनी पोलीस आयुक्त (Commissioner of Police) अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या विविध कार्यासंदर्भातील प्रदर्शन आयोजित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrut Mahotsav of Independence) वर्षांमध्ये पोलीस सामान्य माणसांसाठी काय काय करते, याची माहिती विद्यार्थ्यांपासून तर सामान्य माणसांपर्यंत व्हावीत. यासाठी या प्रदर्शनाचे 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली यावेळी त्यांनी पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीला हीरवी झेंडी दाखवली. तसेच नागपूर ग्रामीणच्या सायबर सेलचे उद्घाटनही केले.
देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम
दुपारी पाच वाजता नव्या पोलीस भवनात आगमन झाल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये जलद प्रतिसाद पदक, बॉम्बशोधक व नाशक पथक, भरोसा सेल, दामिनी सेल, शॉन पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, अग्निशस्त्र प्रदर्शन, अश्रुधुर प्रदर्शन, पोलीस दीदी, पोलीस काका कार्य, गणवेश प्रदर्शन, वाहतूक पोलिसांचे कार्य, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, महाराष्ट्र पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य, आदी विविध स्टॉल आकर्षक पद्धतीने लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर कार्यपद्धती समजावून सांगण्यात येत होती. देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसोबत देशभक्तीपर जयघोष
स्टॉल भेटीनंतर विद्यार्थ्यांची संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी हर घर तिरंगा या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरावर तिरंगा उभारण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देशभक्तीपर जयघोष केला. तत्पूर्वी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस विभागाने अभिनव कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस अनेक प्रकारे काम करत असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनाक्रमाची त्यांचा संबंध असतोच. मात्र जोपर्यंत घटना आपल्या सोबत होत नाही तोपर्यंत पोलिसांचे कार्य माहिती पडत नाही. पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी काय काम करतात त्याची उत्तम मांडणी या स्टॉलवर केली आहे. नागपूरकर जनतेने 15 तारखेपर्यंत असणाऱ्या या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, नवीनचंद्र रेड्डी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन, पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, बसवेश्वर तेली, नरूल हुसेन, गजानन राजमाने, चेतन तिडके यांच्यासह पोलीस दलातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.