विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दाते यांची निवड, मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनापासून रिक्त होती जागा
प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप दाते (Pradeep Date) यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुल, सीताबर्डी, नागपूर येथील कार्यालयात वि. सा. संघाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मनोहर म्हैसाळकर यांचे निधनानंतर वि. सा. संघाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर (Vilas Manekar) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
प्रदीप दाते यांना संस्थात्मक कार्याचा दीर्घ अनुभव आहे. ते गेल्या सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
विदर्भ साहित्य संघाशी गेल्या तीन दशकांपासून प्रदीप दाते संबंधित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ते विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी व साहित्यिकांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत.
प्रदीप दाते यांच्या नेतृत्वात विदर्भ साहित्य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्वास कार्यकारिणीतर्फे व्यक्त करण्यात आला.
विदर्भ साहित्य संघाचे संघाध्यक्ष म्हणून केशवराव कोरटकर, बापूजी अणे, श्री. ना. बनहट्टी, य. खु. देशपांडे, पु. य. देशपांडे, वि. भि.कोलते. मा. गो. देशमुख, ग. त्र्य. माडखोलकर, कुसुमावती देशपांडे, शं. दा. पेंडसे, भ. श्री. पंडित, ह. ना. नेने, पुरुषोत्तम ढवळे, ना. रा. शेंडे, आ. रा. देशपांडे, वा. कृ. चोरघडे, दि. ब. पंडित, वि. भि. कोलते, आर. रा. देशपांडे, मधुकर आष्टीकर, प्राचार्य राम शेवाळकर, सुरेश द्वादशीवार यांनीही काम पाहिले. 1923 पासून हा संघ कार्यरत आहे.