Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताडोबासंदर्भात भूमिका सकारात्मक आहे. ताडोबात पर्यटकांसाठी आणखी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ताडोबा प्रकल्पाच्या विकासासाठी सफारी तसेच टायगर रेस्क्यू सेंटर असा 140 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ताडोबात जखमी वाघांवरही उपचार होणार होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्प (Tadoba Project) आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी टिव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताडोबासंदर्भात भूमिका सकारात्मक आहे. ताडोबात पर्यटकांसाठी आणखी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ताडोबा प्रकल्पाच्या विकासासाठी सफारी तसेच टायगर रेस्क्यू सेंटर (Tiger Rescue Center) असा 140 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ताडोबात जखमी वाघांवरही उपचार होणार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या एजंसीजने दिलेली माहिती ओबीसी आयोगाकडे तपासणीला पाठविण्यात आली आहे. ही माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे. राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मिटला आहे. आता केंद्र सरकारने ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असेही ते म्हणाले. घटनादुरुस्तीसाठी भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती करावी. राज्य सरकारने जे करायचे ते केलं. आता केंद्र सरकारने आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रावर आरोप, राज्य सरकारची पाठराखण
कोरोना मृत्यू या विषयावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सुरुवातीपासून गरजेच्या उपाययोजना केल्या नाही. म्हणून भारतात कोरोना मृत्यू वाढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधश्रद्धेनुसार थाळी वाजवा, दिवे लावा या गोष्टी केल्या. याचा फायदा झाला नाही, असा आरोप त्यांनी केला. भारतात इतर देशांच्या तुलनेत लसीकरणाला उशीर झाला. देशात निर्बंध लावण्यात उशीर झाला. आंतरराष्ट्रीय विमानांवर सुरुवातीला निर्बंध लावले गेले नाही. पण कोरोनात महाराष्ट्राने उत्तम काम केलं. याचं न्यायालयाने कौतुक केलं, असं म्हणत त्यांनी राज्यसरकारची पाठराखण केली.
बारा आमदारांच्या प्रवेशाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा
बंडातात्या कराडकर यांना मध्यप्रदेश आणि गोव्यात अभ्यास करायला पाठवायला हवं. गोवा, मध्य प्रदेश भाजप राज्यात जाऊन पहावं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून, हा नालायकपणा चाललाय तो बंद करायला हवा, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, बारा आमदारांना सभागृहात प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळणे सभागृहाला बंधनकारक किती आहे, आणि किती नाही याचा अभ्यास सुरु आहे, अशीही त्यांनी स्पष्ट केलं.