चंद्रपूर : सकाळी फिरायला जाणं महिलेला महागात पडलं. कारण दबा धरून बसलेल्या वाघानं या महिलेवर हल्ला चढवला. शेजारी तिच्या मदतीला धावले. पण, तोपर्यंत वाघानं महिलाचा घास घेतला होता. पोंभुर्णा भागात आज सकाळी ही घटना घडली. त्यामुळं या परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत.
वेळवा येथील संध्या विलास बावणे (वय 35) असं मृतक महिलेचं नाव आहे. संध्या सकाळी सहाच्या सुमारास पोंभुर्णा मार्गावर फिरायला गेल्या होत्या. डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. सोबत फिरणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत वाघाने महिलेला ठार करून पोबारा केला. महिलेला दोन मुले आहेत.
वनविभाग व पोलीस विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली.
पोंभुर्णा भागात शेती आहे. पण, शेताशेजारी जंगल आहे. या जंगलातून वाघ केव्हा येईल. तो हल्ला केव्हा करेल, याची काही शास्वती नाही. त्यामुळं शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.
पोंभुर्णा नगरपंचायतची निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रचार सुरू झाला आहे. पण, घराबाहेर पडताना कार्यकर्त्यांना विचार करावा लागतो. सकाळी-सकाळी हा वाघ हल्ला करू शकतो. तर मग रात्री-बेरात्रीचा प्रश्नच नाही. प्रचारातही अडथळे येत आहेत.
दुसरीकडं यवतमाळच्या वणीच्या कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा मुक्त संचार सुरू आहे.
सकाळ पाळीत कामावर जाणाऱ्या वेकोली कामगारांना वाघाचे दर्शन घडले. वाघाच्या मुक्त संचाराने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. चंद्रपूरच्या ताडोबा आणि यवतमाळच्या टिपेश्वरमधून वाघाचे आवागमन होत असल्याची माहिती आहे. वाघाच्या मुक्त संचाराचा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.