Nagpur Vaccination | नागपूर मनपा क्षेत्रात लसीकरण, 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर मनपा क्षेत्रात शनिवारी 12 ते 14 वर्ष वयोगटातील 1 हजार 833 मुलांनी 18 शाळेत कोर्बेव्हॅक्स लसीचा डोस घेतला. तर आतापर्यंत शहरातील 17 हजार 500 पेक्षा अधिक मुलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Preventive Vaccine) पहिला डोस घेतलेला आहे.
नागपूर : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) क्षेत्रात 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Commissioner Radhakrishnan) यांच्या मार्गदर्शनात मुलांच्या लसीकरणाला गती देण्यात आली. मनपातर्फे शहरातील सर्व मनपा, शासकीय व खासगी शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. शाळांमधील या लसीकरण सत्राला 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी मनपा क्षेत्रात 12 ते 14 वर्ष वयोगटातील 1 हजार 833 मुलांनी 18 शाळेत कोर्बेव्हॅक्स लसीचा डोस घेतला. तर आतापर्यंत शहरातील 17 हजार 500 पेक्षा अधिक मुलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Preventive Vaccine) पहिला डोस घेतलेला आहे.
मनपा आरोग्य विभागाशी साधा संपर्क
12 ते 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींना कोव्हिड प्रतिबंधक कोर्बेव्हॅक्स लस देण्यात येत आहे. शाळांमधील लसीकरण सत्रांसाठी मनपाद्वारे मोफत लससाठा, वैद्यकीय कर्मचारी, लस नोंदणी कर्मचारी, आवश्यक वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शाळा व्यवस्थानाद्वारे संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी किंवा मनपाच्या आरोग्य अधिका-यांशी संपर्क साधून सोईनुसार लसीकरण सत्र निश्चित करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी मनपाद्वारे हे महत्वाचे पाउल उचलण्यात आले आहे. यासाठी 12 ते 14 वर्ष वयोगटाच्या सर्व बालकांनी पुढे येऊन लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.