मंत्रिमंडळ विस्तारानंतर 9 मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाही, कुणी केला दावा?; कारण काय?
शिवसेनेच्या 16 आमदारांवर कारवाई होईल. नाही तर इतके दिवस वेळकाढूपणा केला नसता. या 3 लुटारूचे सरकार आहे. त्यांना वाटायचे लोकसभा, विधानसभेत फायदा होईल. मात्र तसे होताना दिसत नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 7 ऑक्टोबर 2023 : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची आस बाळगून आहेत. मधल्या काळात अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मंत्रिमंडळात एन्ट्रीही झाली. पण इच्छुकांना संधीच मिळाली नाही. हा विस्तार कधी होईल हेही सांगता येत नाही. होईलच की नाही याचीही शाश्वती नाही. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी थेट नऊ मंत्री मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्याबाबत वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे समोर आले आहे. आता हसन मुश्रीफ यांना एक मिनिट ही मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. सरकारने हसन मुश्रीफ यांनी एक मिनिट देखील मंत्रिपदावर ठेवू नये. त्यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मंत्री सरकारमध्ये कसा राहू शकतो? हसन मुश्रीफ यांचा राजीनामा लवकरात लवकर सरकारने घ्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
माझ्याकडे शब्द नाहीत
राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. माझ्याकडे शब्द नाहीत असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आगामी काळात 9 मंत्र्यांना काढावेच लागेल. त्यांना गोमूत्र शिंपडून वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला आहे.
त्या 9 मंत्र्यांची नावे मी आता सांगत नाही. पण मंत्रिमंडळाच्या पुनर्रचने नंतर हे नऊ जण मंत्रिमंडळात राहणार नाही, हे खात्रीपूर्वक सांगतो. हे सर्व घोटळेबाजांचे लूटमार करणारे सरकार आहे. 15 दिवसात या भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावे लागेल. या सर्वांवर आम्ही नाही तर भाजपनेच आरोप लावले आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
आजचे मरण उद्यावर…
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कायद्याच्या कचाट्यातून कोणी सुटू शकत नाही. हा प्रकार फक्त आजचे मरण उद्यावर लोटणे असा आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
तो दादांचा बनाव
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या नाराजीवरूनही टीका केली. अजित पवार हे नाराज राहतात हा त्यांचा बनाव आहे. असं करून ते आपल्याला हवं ते सध्या करून घेतात. आमच्या मंत्रिमंडळातही ते असंच करायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.