आम्ही इथल्या सिनेट निवडणुकीला गांभीर्याने घेत नाही; वरूण सरदेसाई यांनी कारणही सांगितलं
जनता हे सगळं पाहत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचा स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचे सरदेसाई म्हणाले.
नागपूर : शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे युवानेते वरूण सरदेसाई यांनी लावला आहे. जर शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे. तो समोर आला पाहिजे. माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे याने तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता. त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे असे वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.
त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात
मुंबई पोलीस सक्षम आहे. ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला आहे. जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत. त्यांच्यावर रोज आरोप होत आहेत, कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहे. मात्र ते नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावरील कारवाया थांबतात.
नागपूर मनपात हे स्पष्ट होईल
जनता हे सगळं पाहत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचे सरदेसाई म्हणाले. भाजपचा ठिकठिकाणी पराभव होत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही काय होईल हे सुस्पष्ट असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. नागपूर महापालिकेवर ठाकरे गटाने लक्ष केंद्रीत केलंय. यापूर्वी संजय राऊत स्वतः येऊन गेले. त्यांनी नागपुरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले.
दहापैकी तीन जागांवर उमेदवार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेले अनेक वर्ष एका विशिष्ट विचारसरणीचा कब्जा आहे. आम्ही कधीही इथल्या सिनेट निवडणुकीला गांभीर्याने घेतलेली नाही. मात्र, आता आम्ही सिनेटच्या दहा जागांपैकी तीन जागांवर लढवत आहोत. त्या तीन जागा आणि उर्वरित सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास असल्याचेही सरदेसाई यांनी म्हंटलं. नागपुरात विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक होत आहे. त्यावर ते बोलत होते.
काल शिंदे गटात झालेला भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आमचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांचं म्हणणं मांडलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलणे योग्य नसल्याचे वरुण सरदेसाई म्हणाले. नागपुरात आले असताना ठाकरे गटाचे युवानेते वरूण सरदेसाई बोलत होते.