Nagpur shocking खऱ्या समजून दिल्या खेळण्यातल्या नोटा, मित्रानेच का दिला साडेचार लाखांचा दगा?
मनोरंजनाच्या खेळण्यातल्या नोटा विनोदनं तिथं ठेवल्या. असली नोटा काढून टाकल्या. दोन दिवसांनंतर प्रवीण विनोदकडं आला. त्यानं ठेवायला दिलेली रक्कम मागितली. तेव्हा आलमारीतून काढून नकली नोटा प्रवीणला दिल्या.
नागपूर : हुडकेश्वर पोलीस हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. एका मित्रानं दुसऱ्याला ठेवण्यासाठी साडेचार लाख रुपये दिले होते. दोन दिवसांनी ते परत करताना त्याला खेळण्यातल्या नकली नोटा दिल्या. ही रक्कम काही थोडीथोडकी नव्हती. तब्बल साडेचार लाख रुपयांची हेराफेरी यात झाली होती. ही बाब लक्षात येताच तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचली.
रक्कम पाहून नियत फिरली
विनोद पाटील आणि प्रवीण मल्लेवार हे दोघे मित्र. हे दोघेही मूळचे गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचे. एकमेकांच्या विश्वासातले. प्रवीणला प्लाट खरेदी करायचे होते. त्याने साडेचार लाख रुपये जमा केले. त्यासाठी खूप मेहनत घेतली. नातेवाईकांकडून उधार-उसणवारी केली. पैसे सुरक्षित राहावेत, म्हणून त्यानं विनोद या मित्राकडं ठेवायला दिले. पण, रक्कम पाहून विनोदची नियत फिरली. त्यानं या साडेचार लाखांच्या नोटांमध्ये हेराफेरी केली.
असलीच्या जागी ठेवल्या नकली नोटा
मनोरंजनाच्या खेळण्यातल्या नोटा विनोदनं तिथं ठेवल्या. असली नोटा काढून टाकल्या. दोन दिवसांनंतर प्रवीण विनोदकडं आला. त्यानं ठेवायला दिलेली रक्कम मागितली. तेव्हा आलमारीतून काढून नकली नोटा प्रवीणला दिल्या. पण, त्याला याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यानं लाल कापडात गुंडाळलेली रक्कम घेतली आणि निघून गेला. त्यानंतर त्यानं त्या नोटा काढल्या. संशयाच्या नजरेनं बघू लागला. तेव्हा त्या नकली नोटा असल्याच्या लक्षात आल्या. प्रवीणनं विनोदला विचारणा केली. पण, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पान्स मिळाला नाही.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या
विनोदनं तो मी नव्हेचची भूमिका घेतली. त्यामुळं प्रवीणला पोलिसांच्या दारात जावं लागलं. पोलिसांनी विनोद पाटीलच्या मुसक्या आवळल्या. विश्वास ठेवताना जरा सावध होण्याची वेळ आली आहे. कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न हॅम्लेट नाटकातल्या नायकाला पडला होता, असा काहीसा प्रश्न आपल्यालाही अशा घटना घडल्या म्हणजे पडतो. म्हणून सावध होण्याची वेळ आली आहे. माणसांची पारख करायला शिकले पाहिजे.