जयंत पाटील यांचं निलंबन का झालं, विधानसभेत नेमकं काय घडलं, पाहा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
निलंबन झाल्यानंतर जयंत पाटील तात्काळ सभागृहातून बाहेर गेले.
नागपूर : अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय. जयंत पाटील म्हणाले, तुम्ही असा निर्लल्लपणा करू नका. अध्यक्ष महोदय. असा शब्दप्रयोग करताचं त्यांना निलंबित करा, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष म्हणाले, सन्माननिय जयंत पाटील साहेब, हे आपल्याकडून अपेक्षित नाही. विधानसभेत केलेलं एक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना भोवलं. सभागृहाची बैठक 15 मिनिटांसाठी स्थगित केली गेली. 15 मिनिटांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं. मंत्री शंभुराज देसाईंनी जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी केली.
देसाई म्हणाले, आपल्याकडं बघून, आपल्याकडं अंगुलीनिर्देश करुन, आपल्याकडं बोट दाखवून अशा पद्धतीचं वक्तव्य सदस्य जयंत पाटील यांनी केलं. त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो. त्यांना निश्चितपणानं या संपूर्ण वक्तव्याबद्दल, त्यांच्या कृतीबद्दल, ती कृती, ते वक्तव्य, हे अध्यक्ष या संसदीय कार्यप्रणालीला, या विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमाला, विधिमंडळाच्या प्रथा परंपरांना या सगळ्या गोष्टींना छेद देणारं आहे.
आपली विशेषत: निंदा करणारं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं निलंबन करा, अशी मागणी मी करतो, असं शंभूराज देसाई म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी सभागृहात माननीय अध्यक्षांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय वक्तव्य केलं. बेजबाबदार वक्तव्य करुन व बेजबाबदार वर्तन करुन अध्यक्षांचा अवमान केला. त्यामुळं चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळं ही विधानसभा असा ठराव करत आहे की जयंत पाटलांचं सदस्यत्व सन 2022 च्या नागपूर अधिवेशन काळातून निलंबित करण्यात यावं. त्यांच्यावर नागपूर आणि मुंबई परिसरात येण्यास बंदी घालण्यात यावी.
चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या निलंबनाचा ठराव मांडल्यानंतर अध्यक्षांनी यावर तोंडी मतदान घेतलं. निलंबन झाल्यानंतर जयंत पाटील तात्काळ सभागृहातून बाहेर गेले.