यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. अठरा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. अवैध सट्टा, सुगंधी तंबाखूवर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या धाडसत्रानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आली.
यवतमाळ : अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police, Amravati) (डीआयजी) चंद्रकिशोर मिना यांनी शनिवारी धाडसत्र राबवलं. डीआयजी पथकाने वणीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाड टाकली. पथकाने एकाच वेळी शहरात चालणारे चार मटका अड्डा व दोन सुगंधित (प्रतिबंधीत) तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकली. अमरावतीहून टीम येऊन वणीत कारवाई करीत असल्याने या प्रकरणी वणी पोलीस ठाण्याचे (Wani Police Station) पितळ उघडे पडले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात होते. 23 कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspension on 4 employees) कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्यापैकी एक पोलीस कर्मचारी पाय फ्रॅकचर झाल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होता. तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेमणूक असलेल्या एका कर्मचार्यालाही दोषी ठरविण्यात आलंय. पण, ठाणेदाराला अभय का देण्यात आला, अशा प्रश्न विचारला जात आहे.
ठाणेदाराला अभय का?
वणीत हे सर्व अवैध धंदे ठाणेदाराच्या आशीर्वादाने सुरू होते. ठाणेदाराच्या परवानगीशिवाय हे सर्व शक्यच नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. वणी शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूच्या विक्री बाबतही पुरावे गोळा केले. शनिवारी 29 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरात सुरू असलेले चार मटका अड्डे व दोन प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणार्या व्यावसायिकांवर धाड टाकली. या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका प्रकरणी 43 जणांवर तर तंबाखू विक्री प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वणीत क्रिकेट सट्टा व मटकाच्या व्यवसायात दर दिवशी लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असते.
19 कर्मचाऱ्यांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली
या प्रकरणी डीबी पथक इंचार्ज एएसआय सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर व डीबी पथकाचे इकबाल शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वणी ठाण्यातील काही पोलिस अधिकार्यांसह 19 कर्मचाऱ्यांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. शहरात आणि उपविभागात अवैध व्यवसाय फोफावला आहे. याची माहिती अमरावती येथील पोलीस निरीक्षक कार्यालयात पोहोचली. यावरून अमरावतीतील पथकाने वणीत येऊन रेकी केली. अनेक ठिकाणावर स्वत: जाऊन मटका अड्डा सुरू असल्याची खात्री केली.