‘माझं कुणीही वाकडं करु शकत नाही’, नाना पटोले यांचं काँग्रेसमधील ‘त्या’ नेत्यांना प्रत्युत्तर?
नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसमधीलच काही दिग्गज नेत्यांनी काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर आता नाना पटोले यांनी रोखठोक शब्दांत उत्तर दिलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तसेच काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. असं असलं तरी या चर्चांवर काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतिशय रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला नेमकं काय सुरुय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा सातत्याने पुढे येत असतात. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा एक गट विरुद्ध नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु असतात. विशेष म्हणजे पक्षातील दिग्गज नेते माध्यमांसमोर उघडपणे देखील भूमिका मांडताना दिसतात. तर काही नेते दिल्लीत हायकमांडकडे जावून नाना पटोले यांच्याबद्दल तक्रारदेखील करतात, अशी देखील चर्चा सुरु होती. आता तर थेट नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागेल, अशा चर्चा सुरु आहेत. याच चर्चांवर आता नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“माझ्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस आगामी निवडणुका लढवणार आहे”, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. “येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्ष म्हणून काम करेन”, असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. तसेच “माझं कुणीही वाकडं करु शकत नाही”, असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी या वक्तव्यातून पक्षातील विरोधकांना कडक शब्दांत उत्तर दिलं असल्याची चर्चा आहे.
‘या गोष्टींना काँग्रेसमध्ये कोणतंही स्थान नाही’
“मी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर पडदा पडलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काँग्रेसमध्ये कोणतंही स्थान नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्याच जागा कशा जिंकायच्या यासाठी आमचा प्लॅन सुरु झालेला आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मेरीटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मेरीटवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. मेरीटवर निर्णय घेऊ आणि काँग्रेसचंच पुण्यामध्ये मेरीट आहे”, असा दावा पटोलेंनी केला.
नाना पटोले यांचा भाजपवर निशाणा
“या देशाचा मूळ इतिहास आहे, त्या इतिहासाला संपवण्याचा मानस भाजपचा आहे. आपण काल दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पाहिलं की, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा काढणे हा केवळ महिलां अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या शूरवीर महिलांनी जागतिक पातळीवर जो विचार दिला त्या विचाराला संपवण्याचं काम भाजप करत आहे. या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो. संविधानिक व्यवस्था संपवणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो”, असं नाना पटोले म्हणाले.