”पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान”
देशाची 70 वर्षांत झालेली प्रगती तसेत भारत स्वातंत्र्यानंतर आत्मनिर्भर म्हणून जगात ताठ मानेने उभा राहिला, तो नेहरू यांच्या सक्षम, कणखर नेतृत्वामुळेच, असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून केलेले विधान हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यपालांवर हल्लाबोल केलाय. शांततेचा पुरस्कार करणे म्हणजे कमकुवतपणा नसतो, त्यासाठी मौठे धैर्य लागते. देशाची 70 वर्षांत झालेली प्रगती तसेत भारत स्वातंत्र्यानंतर आत्मनिर्भर म्हणून जगात ताठ मानेने उभा राहिला, तो नेहरू यांच्या सक्षम, कणखर नेतृत्वामुळेच, असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.
पंडित नेहरुंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवले जातात
परंतु पंडित नेहरुंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवले जातात, तो नेहरुद्वेषच राज्यपालांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे, असंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. राज्यपालांचे हे विधान देशासाठी बलिदान देणाऱ्या व समस्त भारत देशाचा अवमान करणारे आहे. या विधानाबद्दल कोश्यारी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात
पंडित नेहरुंबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे.त्यांनी आतापर्यंत केलेली विधाने त्यांच्या विशिष्ट राजकीय विचारधारेतुनच आलेली आहेत. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपाधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारातून ते राज्यपाल पदावर असतानाही बाहेर आलेले दिसत नाहीत.
…तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा
राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत. राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे त्यापदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहमंत्रालयाने कोश्यारी यांना परत बोलावावे.
नेहरूंच्या सक्षम नेतृत्वामुळेच देश उभा राहिला
पंडित नेहरु ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या दूरदर्शी, सक्षम नेतृत्वामुळेच देश उभा राहिला आहे. वाजपेयी सरकार आधीच देशाने अणु कार्यक्रमाची पायाभरणी केली होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लष्करी ताकद किती होती आणि त्यानंतर पंडित नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात देश लष्कराच्या बाबतीत सामर्थ्यवान बनला हे त्यांना दिसले नाही. अमेरिका व रशिया या दोन बलाढ्य जागतिक शक्तींना न जुमानता अणु कार्यक्रम राबविले. इंदिरा गांधींच्या सक्षम नेतृत्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला. हे कोश्यारी यांना माहित नाही का? अटलबिहारी वाजपेयी यांनीही पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता सुरु केली होती.
शांतीवार्ता करत असतानाच पाकिस्ताने कारगिल युद्ध घडवले
वाजपेयी पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता करत असतानाच पाकिस्ताने कारगिल युद्ध घडवून आणले, मग वाजपेयी यांच्या शांततेच्या वाटाघाटी कमकुवतपणाचे लक्षण म्हणायचे का? नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानने वारंवार सीमेवर हल्ले केले, पुलवामा हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. पाकिस्तानी कुरापती करत असतानाही नरेंद्र मोदी अनाहूतपणे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन भेटले तेही कमुवतपणाचे लक्षणच म्हणायचे का? अहिंसा हे जगातले सर्वात मोठे हत्यात आहे असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. अहिंसेच्या मार्गानेच इंग्रजांना हरवले, मग महात्मा गांधी कमकुवत होते असे कोश्यारी यांना म्हणावयाचे आहे का?
प्रगतीत दिलेले योगदान नाकारणारे त्यांचा अपमान करणारे आहेत
वाजपेयी यांच्या आधीची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नव्हती हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान पंडित नेहरुंपासून डॉ. मनमोहन सिंह यांच्यापर्यंतच्या सर्व सरकारांचे देशाच्या विकासात, प्रगतीत दिलेले योगदान नाकारणारे त्यांचा अपमान करणारे आहे. कोश्यारी यांचे विधान अत्यंत चुकीचे व जाणीवपूर्वक केलेले आहे. अशी विधाने राज्यपालपदावरील व्यक्तीला शोभा देत नाहीत, असे पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या
nana patole criticism on governor bhagat singh koshyari on pandit jawaharlal nehru statement