Nanded | खासगीकरणाविरोधात महावितरणचा देशव्यापी संप, नांदेडमध्ये कर्मचाऱ्यांची निदर्शनं, ऊर्जांमंत्र्यांचा काय इशारा?
संपकऱ्यांनी नागरिकांची अडवणूक करू नये. खासगीकरणावर आपण चर्चा करण्यास तयार आहोत. आम्हीदेखील याच्या विरोधात आहोत, असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसमोत आज व्हीसीच्या माध्यमातून चर्चा करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.
नांदेडः महावितरण (MSEDCL), महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध करत देशभर राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. नांदेडमधील (Nanded) महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. महावितरणच्या कार्यालयासमोर आज कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाला (Privatization) कर्मचाऱ्यांनी विरोध केला. तसेच केंद्राच्या विद्युत संशोधन कायद्यालाही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. रविवारी रात्री 12 वाजेपासून राज्य सरकारच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. नांदेडमधील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे . मात्र संपामुळे वीज पुरवठा सेवेवर परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले .
वीज पुरवठा सुरळीत, कार्यालय ठप्प
नांदेडमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारला असला तरीही वीज पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात आले आहे. नांदेडमधील केवळ महावितरणचे कार्यालयीन कामकाज ठप्प आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
संपकरऱ्यांवर मेस्मा
दरम्यान, महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करण्यात येईल, असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. . राज्य शासनाने शनिवारी यासंदर्भात एक आदेश प्रसिद्ध केला होता. सध्या उन्हाळ्यातील वाढलेले तापमान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा, विविध पिकांना पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पुरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
‘अडवणूक नको, चर्चेतून मार्ग निघेल’
दरम्यान, संपकऱ्यांनी नागरिकांची अडवणूक करू नये. खासगीकरणावर आपण चर्चा करण्यास तयार आहोत. आम्हीदेखील याच्या विरोधात आहोत, असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसमोत आज व्हीसीच्या माध्यमातून चर्चा करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.
इतर बातम्या-