थांबला तो संपला; म्हणूनच निवृत्तीनंतरही तो थांबला नाही, भर रस्त्यात उभा राहून अखंड सेवा देतो, नावनंच नाही तर मनाचाही अमीर!
जगतात तर सगळेच. पण मनाची श्रीमंती कायम राखत जिवंत असण्याचा दाखला देणारे फार कमी असतात. नांदेडच्या एका अवलियानं हीच मनाची समृद्धी टिकवून ठेवलीय.
राजीव गिरी, नांदेड : थांबला तो संपला असं म्हणतात. म्हणूनच नांदेडच्या (Nanded) एका अवलियानं आयुष्यात थांबायचच नाही, असं ठरवलं. सामान्य जनेतेची सेवा (Service) करण्याची संधी जीवनात मिळाली. तीच सेवा निवृत्तीनंतरही अखंड सुरूच ठेवायचं त्यांनी ठरवलं आणि ते जिद्दीने करूनही दाखवलं. रिटायर्डमेंटनंतरही मागील तीन वर्षापासून नांदेडचे ट्रॅफिक पोलीस अखंडपणे सेवा देतायत. तेसुद्धा निःशुल्क. नांदेडच्या या अवलियाची चर्चा राज्यभरात सुरु आहे. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकच ट्रॅफिक पोलिसाने काही काळ अशा प्रकारे निःशुल्क सेवा दिली तर वाहतूक पोलिसांवरचा भरही हलका होईल, असं ते सांगतात.
कोण आहे हा अवलिया?
सेवानिवृत्ती नंतर कर्मचारी आपल्या कामातून मुक्त होतो, पण कामातून मुक्त झालो तरी कर्तव्यातून मुक्त झालो नाही या भावनेतून एक सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचारी दररोज वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतोय. शेख अब्दुल शेख अमीर हे नांदेड च्या वाहतूक विभागात कार्यरत होते. 2020 साली ते सेवानिवृत्त झाले. ड्युटीवर असताना कधी एक क्षणही खाली न बसणारा इमानदार कर्मचारी म्हणून ते नांदेड शहरात प्रसिद्ध आहेत. तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असले तरी शेख अब्दुल दररोज न चुकता नांदेड च्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याचे काम करताहेत. कुठलाही मोबदला न घेता दररोज अडीच ते तीन तास वाहतूक पोलीस म्हणून ते काम करतात. जिथे वाहतुकीची अडचण असेल त्या ठिकाणी त्यांना दररोज ड्युटी लावली जाते. त्यांची सेवाभाव वृत्ती पाहून त्यांना सेवानिवृत्ती नंतरही वाहतूक शाखेची वर्दी घालण्याची परवानगी देण्यात आलीये.
मनाचीही श्रीमंती मोठी
शेख अब्दुल शेख अमीर हे फक्त नावानेच नाही तर मनानेही मोठे आहेत. त्यांचे विचारही सामान्यांसाठी आदर्शवत आहेत. माणूस काम करून कधीच मरत नाही तर काम न केल्याने माणूस मरतो, त्यामुळे प्रत्येकाने अंगात शक्ती आहे तोपर्यंत कर्तव्य पार पाडावे असा संदेश शेख अब्दुल यांनी दिलाय. शेख अब्दुल सारखेच इतरांनी विनामूल्य सेवा दिल्यास वाहतूक विभागवरील बराच ताण कमी होऊ शकतो. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यावर दप्तर दिरंगाईचा सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो, शासकीय कर्मचारी वेळेत काम करत नाहीत अशी सार्वत्रिक ओरड असते. मात्र नांदेडचे पोलीस कर्मचारी शेख अब्दुल या सगळ्याला अपवाद ठरले आहेत. रुपयाचीही अपेक्षा नसताना सेवानिवृत्तीनंतर सेवा देताना ते कर्तव्यदक्ष राहत सेवा देतायत. त्यामुळे ते नांदेडमध्ये लोकप्रिय बनले आहेत.