‘घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर नारायण राणे यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया काय?
"आमदार वैभव नाईक यांना काय धमकी द्यायची? ते माझ्या धमकी देण्याच्या लायक आहेत का? वकिलाने सांगितलं असेल की, मारुन टाकेल असं म्हण म्हणजे ऑफेन्स होतो. वैभव नाईक यांना धमकी देण्याची गरज नाही. मी मनात आणेन तेव्हा तसं करु शकतो", असं नारायण राणे म्हणाले.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला. या राड्यादरम्यानचा भाजप नेते नारायण राणे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, असं नारायण राणे या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन विरोधकांकडून नारायण राणेंवर निशाणा साधला जातोय. या सर्व गदारोळानंतर नारायण राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. “राजकोट किल्ल्यावर सुरुवातीपासून जे उपस्थित होते त्यांना काल तिथे काय घडलं ते माहिती आहे. तुमच्यातील काही पत्रकारही तिथे उपस्थित होते. त्यामुळे घडलं काही नाही. मी काही घडवायला गेलो नाही. दुर्दैवी घटना घडली, ती पाहण्यासाठी गेलो होतो”, असं नारायण राणे म्हणाले.
“मी मुंबईहून आलो आणि राजकोट किल्ल्यावर निघालो. त्याअगोदर मी पोलीस आणि कलेक्टर यांना दुपारी बारा वाजता येत असल्याचं कळवलं होतं. त्याप्रमाणे मी आलो. जागेवर गेलो. माझ्याबरोबर माजी खासदार निलेश राणे होते. आम्ही महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणची पाहणी केली. पुतळा खाली पडला होता आणि झाकून ठेवला होता. तिथे पाहण्यासारखं काही नव्हतं”, असं नारायण राणे म्हणाले.
‘कुणालाही सोडलं जाणार नाही’
“पुतळा कोसळला हे वास्तव आहे. आता त्यासाठी जे दोषी असतील, पुतळा कोणी बसवला, काम कुणी केलं, या सगळ्यांची चौकशी होणार. कुणालाही सोडलं जाणार नाही. चौकशी होईल आणि दुसऱ्या बाजूला पुतळा बसवण्यासाठी काम सुरु झालं आहे. शिवरायांचा तशा दर्जेदार पुतळा बसण्यासाठी काम सुरु झालं आहे”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
“हे जे आताचं राजकारण आहे ते मतांसाठी सुरु आहे. ही लाचारी आहे. महाराजांचा पुतळा पडला. काही कारणं असतील. तुम्ही उलट सांगा की, लवकर नवा पुतळा तयार करा. आम्हाला नतमस्तक व्हायचं आहे. आठ महिन्यांमध्ये काल आल्यापैकी किती जण आले होते? तेव्हा महाराजांना नमस्कार करावं वाटलं नाही. पुतळा पडल्यावर सरकारवर टीका करायला मिळावी म्हणून आले. हे दुर्दैवी आहे”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
राजकोट किल्ल्यावर काय घडलं?
“आम्ही निघालो होतो. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेटले. त्यांनी नमस्कार केला. दादा नमस्कार. मी नमस्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेटले. ते घोषणा द्यायचे, अंगावर यायचे तसे घोषणा द्यायचे म्हणून मी सांगितलं की, ह्यांना नाही सोडायचं. अशी हुशारी कुठेही चालणार नाही. त्यामुळे त्यांना दोन तास माझ्या परवानगीशिवाय जाता आलं नाही”, असं नारायण राणे म्हणाले.
“पोलिसांनी कुणावर कारवाई केली? काय प्रसंग ओढावला? मी पोलिसांवर कोर्टात केस करेन. आम्ही काय केलं? आम्ही काही केलंच नाही. उलट आम्ही पोलिसांना सहकार्य केलं. गुन्हा दाखल करु द्या. माझ्यापर्यंत येऊद्या”, असं नारायण राणे म्हणाले.
‘त्यावेळेस उद्धव ठाकरे कुठे होते?’
“आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबर ओळखतात. शिवसेनेत होतो तेव्हा आक्रमक होतो तेव्हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही बोलले नाही. त्यावेळेस ते कुठे होते? त्यामुळे उद्धव ठाकरे तू माझ्यावर बोलू नकोस”, असं नारायण राणे म्हणाले.
राणेंचा वैभव नाईकांवर निशाणा
“आमदार वैभव नाईक यांना काय धमकी द्यायची? ते माझ्या धमकी देण्याच्या लायक आहेत का? वकिलाने सांगितलं असेल की, मारुन टाकेल असं म्हण म्हणजे ऑफेन्स होतो. वैभव नाईक यांना धमकी देण्याची गरज नाही. मी मनात आणेन तेव्हा तसं करु शकतो”, असं प्रत्युत्तर नारायण राणे यांनी दिलं.
राणेंचा संजय राऊतांवर निशाणा
नारायण राणे यांना संजय राऊत यांचा प्रश्न विचारलं असता, “अरे बाबा, जाऊदे माझी संध्याकाळ चांगली जाऊदे. संजय राऊत म्हणजे काय? संजय राऊत येऊदे, तो फक्त वाईट बोलणं आणि टीका करण्यापलिकडे त्याच्या आयुष्यात काही नाही. तो कुणाला चांगला बोलला नाही. खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणून माणुसकीचा धर्म आहे. पण तो म्हणत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.