Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड
राज्याच्या आरोग्य सचिवांनी नाशिकमध्ये येत्या पाच दिवसांत अफाट संख्येने रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवलीय. ती आता खरी होताना दिसत आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात अक्षरशः कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत असून दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या आकडेवारीने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार सध्या जिल्ह्यात 1 हजार 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्य सचिवांनी नाशिकमध्ये येत्या पाच दिवसांत अफाट संख्येने रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवलीय. ती आता खरी होताना दिसत आहे.
असे आहेत रुग्ण
जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 953 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 9, चांदवड 5, देवळा 11, दिंडोरी 53, इगतपुरी 9, मालेगाव 5, नांदगाव 7, निफाड 50, सिन्नर 21, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 5, येवला 6 अशा एकूण 215 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 784, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 34 रुग्ण आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 14 हजार 755 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 1, चांदवड 2, देवळा 5, दिंडोरी 3, इगतपुरी 1, कळवण 4, मालेगाव 1, नांदगाव 1, निफाड 12, सिन्नर 2 असे एकूण 32 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.18 टक्के, नाशिक शहरात 98.94 टक्के, मालेगावमध्ये 97.11 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 248 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 27, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 758 रुग्णांचा मृत्यू आजपर्यंत झाला आहे.
पाच दिवस धोक्याचे
ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात 13 लाख 63 हजार नागरिकांपैकी 12 लाख 64 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे. यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
शाळांचे काय होणार?
नाशिकमध्ये झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण पाहता आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होत आहे. या बैठकीत शहरातील शाळा आणि कॉलेज सुरू ठेवायचे की बंद करायचे, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य सचिवांनी दिलेला इशारा आणि गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू झालेला रुग्णांचा गुणाकार पाहता, या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. सध्या मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा निर्णय नाशिकबाबतही होऊ शकतो. कारण नाशिकच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
इतर बातम्याः
Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?
Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात