Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?
व्यावसायिक शाखा आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आहे. त्यात 50 टक्के सवलत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा असतो.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यासह सबंध राज्यभर ‘महाडीबीटी’ (MahaDBT) पोर्टल कधी संथ, तर कधी हँग झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता आले नाहीत. त्यामुळे या शिष्यवृत्तींसाठी (Scholarship) अर्ज भरायला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhanjay Munde) यांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, व्यावसायिक शाखा आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आहे. त्यात 50 टक्के सवलत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा असतो. सोबत इतर 14 शिष्यवृत्ती योजना आहेत. त्यात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अल्पसंख्याक विद्यार्त्यांसाठीची योजना, एकलव्य आर्थिक साह्य योजना आदींचा समावेश आहे. या साऱ्या योजनांसाठी अर्ज भरायला आता मुदतवाढ मिळाली आहे.
प्रक्रियेचा बोजवारा
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021-2022 या वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून वेळेत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी हे अर्ज भरायला दोन-दोन दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, पोर्टल संथ झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 1/2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 31, 2022
इकडे लक्ष द्या…
ज्या विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करू नये. तसेच नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त यूजर आयडी तयार केल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असेही कळवण्यात आले आहे.
नव्याने अर्ज करण्यासाठी…
– MahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
– पोर्टलवर लॉग इन व्हा.
– तुमचे प्रोफाइल तयार करा.
– ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
इतर बातम्याः
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?