Nashik | शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा
प्रसाद क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात सध्या अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. ते 14 फेब्रुवारी, सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सेवेच्या ठिकाणी जात होते. मात्र, ते आणि त्यांचे सहकारी ज्या ट्रकमध्ये बसले होते, तो ट्रक दरीत कोसळला. या घटनेत प्रसाद क्षीरसागर शहीद झाले.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी येथील शहीद (Martyr) जवान प्रसाद कैलास क्षीरसागर यांच्यावर (वय 24) गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. शहीद जवान, अमर रहे…या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रसाद क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात सध्या अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. ते 14 फेब्रुवारी, सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सेवेच्या ठिकाणी जात होते. मात्र, ते आणि त्यांचे सहकारी ज्या ट्रकमध्ये बसले होते, तो ट्रक दरीत कोसळला. या घटनेत प्रसाद क्षीरसागर शहीद झाले. त्यांच्या मागे आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या एकट्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. विशेष म्हणजे ते गेल्याच महिन्यात सुट्टीवर आले होते. 30 जानेवारी रोजी सुट्टी संपवून ते पुन्हा अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर रुजू झाले होते.
अंत्यसंस्काराला जनसागर
अरुणाचल प्रदेश येथून आज सकाळी त्यांचे शव नाशिकमध्ये आले. त्यानंतर दिंडोरी येथे नेण्यात आले. येथे सिडफार्म येथील जागेवर शासकीय इतमामात प्रसाद क्षीरसागर यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी यावेळी आकांत केला. त्यामुळे उपस्थितांच्या डोळेही पाणावले. अतिशय समजुतदार, शांत अशी प्रसाद यांची ओळख होती. त्यांच्या अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. शहीद जवान प्रसाद क्षीरसागर अमर रहे…अशा घोषणा उपस्थितांनी देत त्यांना अखेरचा निरोप दिला.
पालकमंत्र्यांची श्रद्धांजली
शहीद जवान प्रसाद क्षीरसागर यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही श्रद्धांजली वाहिली. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दिंडोरी येथील जवान प्रसाद क्षीरसागर यांना अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आले आहे. हे अतिशय दु:ख झाले. सैन्यदलात भरती झालेले प्रसाद क्षीरसागर यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने क्षीरसागर कुटुंबासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय शहीद जवान प्रसाद क्षीरसागर यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!