Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!
म्हाडा प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला आहे.
नाशिकः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिक महापालिकेवर एक-दोन नव्हे, तर तब्बल 700 कोटी रुपयांच्या नुकसानीचे खापर फोडले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार चर्चेत आला आहे. यामागचा सूत्रधार कोण, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
2014 च्या कायद्यानुसार शहरातील मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील (4 हजार चौरस फुटापेक्षा जास्त बांधकाम) 20 टक्के घरे हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. मात्र, नाशिकमध्ये असे अनेक बिल्डरांनी केलेच नाही. अशा बिल्डरांवर महापालिकेने कृपाक्षत्र धरत त्यांना ‘एनओसी’ अर्थातच ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे, असा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करून केला आहे.
आव्हाड काय म्हणतात?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी, 19 जानेवारी रोजी एक ट्वीट केले. त्यात ते म्हणतात, नाशिक महापालिकेतील विकासकांनी म्हाडाला द्यायचे प्लॅट दिलेले नाहीत. त्याकडे महापालिकेने घोर दुर्लक्ष केले आहे. असे 3500 प्लॅट म्हाडाला मिळणार होते. मात्र, ते मिळाले नसल्यामुळे एकूण 700 कोटींचे नुकसान झाले आहे. याची सारी जबाबदारी नाशिक महापालिकेची आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.
Nashik Municipal Corporation has not given flats to #MHADA which was to be given by developers Its gross negligence by the municipal corporation #MHADA was to be given 3500 flats by corporation the total loss will b 700 crores It’s responsibility of Nashik Municipal Corporation
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 19, 2022
आयुक्तांचा कारवाईचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 च्या नव्या कायद्यानंतर अशी 80 प्रकरणे उघडकीस आली असून, यात कसलिही अनियमितता नसल्याचा दावा, प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र, थेट मंत्र्यांनी आरोप केल्यामुळे महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. स्वतः आयुक्त कैलास जाधव यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत कैलास जाधव टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, याप्रकरणाची आम्ही चौकशी सुरू आहे. सारी प्रकरणे तपासत आहोत. याचा अहवाल म्हाडाच्या प्रादेशिक विभागाला देण्यात येईल. ते पुढे त्यांचा अहवाल पाठवतील. यात कोणी दोषी सापडले, तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाने म्हाडाप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंतची सारी प्रकरणे तपासत आहोत. याचा अहवालही आम्ही म्हाडाकडे देऊ. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
इतर बातम्याः
Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?
Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?
Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!