Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?
निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल असे गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे.
नाशिकः नाशिक महापालिका (Municipal Corporation Election) निवडणुकीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी. अखेर महापालिकेच्या वतीने प्रभागांमधील आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती निवडणूक आयोगाला सादर केल्यामुळे पुढील आठवड्यात म्हणजेच जानेवारीअखेरीस महापालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिकेची मुदत 15 मार्चला संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित आहे.
काम का रखडले?
डिसेंबर महिन्यात महापालिकेने निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर केला. मात्र, 6 जानेवारी रोजी 44 प्रभागांमधील आरक्षण निश्चितीसाठी आयोगाने सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लोकसंख्या आणि इतर सांख्याकिती माहिती सुधारित आराखड्याद्वारे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आणि इतर कारणामुळे ही माहिती सादर करण्यास उशीर झाला. पालिकेचे उपायुक्त मनोज घोडे यांनी नुकतीच ही महत्त्वाची कागदपत्रे आयोगाकडे सादर केली. त्यात कसलाही आक्षेप नसल्यास जानेवारी अखेरीस प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर पंधरा दिवसांत त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
ओबीसा जागा खुल्या प्रवर्गात
महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यात 19 जागा अनुसूचित जाती, 10 जागा अनुसूचित जमाती, 36 जागा इतर मागास प्रवर्ग आणि 68 जागा खुल्या राहणार होत्या. मात्र, आता ओबीसी प्रवर्गाच्या 36 जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा वाढून 104 होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल असे गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू आहे.
कोरोनाचे सावट
राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.
महापालिकेतील सध्याचे बलाबल
– भाजप – 67
– शिवसेना – 34
– काँग्रेस – 6
– राष्ट्रवादी – 6
– मनसे – 5
– इतर – 3
इतर बातम्याः
Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन