कोरोनाचा उद्रेक तोपर्यंत तोबा गर्दी, नंतर नागरिकांनी फिरवली पाठ, लसीकरणाची धक्कादायक आकडेवारी काय?
महिन्यांपूर्वी लसीकरण केंद्राच्या बाहेर अक्षरशः रांगा लागत होत्या, लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळत होता. तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना उद्रेक सुरू असतांना ज्या ज्या नागरिकांना लसीकरण केले जात होते. त्यांना एकप्रकारे जिवदान मिळाले असं बोलले जातं होतं. त्यामुळे लसीकरण म्हणजे कोरोना सुरक्षा कवचच असल्याचे सांगितलं जात असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लसीकरण केंद्रांवर अक्षरशः रांगा लागत होत्या. मात्र, त्यामध्ये अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने नागरिक काहीही करून लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत होते. कुणी पैसे मोजून लस घेत होते. तर कुणी लस घेण्यासाठी वशिला लावत होते. असे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामध्ये महत्वाची एक बाब म्हणजे लसीकरण म्हणजे सुरक्षाकवच आणि लस घेतली तर कोरोना पासून वाचू असेच बोलले जात होते.
त्यामुळे लसीकरणाचे नागरिकांना महत्व पटले होते. त्यानंतर बहुतांश नागरिकांनी लस घेतल्यानंतर होणारा त्रासही सहन केला. मात्र, नंतर काळात जसजसा कोरोना हद्दपार झाला तसतसा लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होत गेली.
खरंतर लसीकरण घेण्यासाठी काही नियम होते. पहिला डोस झाल्यावर महिन्यानंतर दूसरा डोस घेता येत होता. त्यानंतर तो कालावधी वाढून तीन महिन्यानंतर केला. त्यानंतर बूस्टर डोस सहा महिन्यांनी घेता येत होता. त्यामुळे एकूणच लसीकरण घेत असतांना मध्ये काही महिन्यांचा कालावधी जात होता.
याच काळात कोरोना हद्दपार झाला. त्यात लसीकरण झाल्यावर बहुतांश जणांना थंडी ताप आला होता. काहींचे तर हातपाय गळाले होते. त्यामुळे नागरिकांनी लस घेणं टाळल्याचे समोर आले आहे. सरकारच्या माध्यमातून लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन केले जात असतांना नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही.
नाशिक मधील परिस्थिती पाहिली तर अवघ्या 12 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. त्यानंतर दूसरा डोस 76 टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर पहिला डोस हा 93 टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे 18 वर्षाखालील एकानेही बूस्टर डोस घेतलेला नाहीये.
एकूणच काय तर कोरोना हद्दपार झाला असल्याने लसीकरणाची गरज काय म्हणून नागरिकांनी लसीकरण करणं टाळलं होतं. तर दुसरीकडे काही ठिकाणी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर काहींनी गरज म्हणून लसीकरण करून घेतले.
तर दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर आता गर्दी होत असून विचारणा केली जात आहे. कोरोना पुन्हा डोकं वर काढत असतांना लसीकरण पूर्ण करून घेण्याची काही नागरिक करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण केंद्र सज्ज करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली केल्या जात आहे.
नाशिक शहरात यापूर्वी लस अक्षरशः पडून कालबाह्य झाल्या होत्या. आता पुन्हा दहा हजार लसी उपलब्ध केल्या जाणार असून आता तरी नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे असं आवाहन महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे.