निवडणूक बाजार समितीची पण ट्रेलर मात्र विधानसभेचा, आजी-माजी आमदारांनी थोपटले दंड, राजकीय आखाडा तापला
राज्यात सध्या बाजार समितीची निवडणूकीचा धुराळा उडाला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील राजकारण यानिमित्ताने चर्चेला येत असून पिंपळगाव बाजार समितीची जोरदार चर्चा होत आहे.
नाशिक : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावात राजकारण तापलेलं आहे. ठिकठिकाणच्या बाजार समितीमध्ये गटतट बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीकडे विशेष लक्ष आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचं नाव आहे. त्यात विळ्या भोपळ्याचे नातं असलेले आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. खरंतर 2015 च्या निवडणूक या दोन्ही नेत्यांनी सामंज्यसपणे बिनविरोध केली. मात्र, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्यानं आजी माजी आमदारांना तोंड द्यावे लागले होते.
2015 ची ज्या स्थितीत निवडणूक झाली होती त्याच्या उलट सध्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर मागील निवडणुकीत आमदार म्हणून अनिल कदम होते. तर आता दिलीप बनकर आमदार आहे. त्यात दोन्ही विरोधी आघाडीचे होते आता मात्र दोघेही महाविकास आघाडीत आहे.
त्यामुळे मागील वेळेपेक्षा चित्र वेगळं असल्याने निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदार हे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीच आणि इतर सहकारी संस्थाचे सदस्य असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थकारण यानिमित्ताने होत असतं.
स्थानिक पातळीवर झालेला खर्च यानिमित्ताने वसूल करण्याची संधी चालून आलेली असते. त्यामुळे कार्यकर्ते यंदाच्या वर्षी बाशिंग बांधून आहे. त्यामुळे अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्याकडून सुरुवातीपासून चढाओढ पाहायला मिळत आहे.
यामध्ये एक विशेष बाब म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार असलेल्या सहा संस्थांच्या बाबत सुरुवातीपासून आक्षेप घेतला जात होता. निबंधक कार्यालयात अनिल कदम यांना या लढाईत यश मिळाले होते. तर दुसरीकडे यावर आक्षेप घेत दिलीप बनकर यांनी सहा संस्थाच्याबाबत स्थगिती मिळवली होती.
तर दुसरीकडे बेकायदेशीर असलेल्या संस्थांच्या याबाबत न्यायलयीन लढाई लढत अनिल कदम यांनी दिलीप बनकर यांना धक्का दिला होता. त्यावरून आता पहिली लढाई माजी आमदार अनिल कदम यांनी जिंकली आहे. त्यामुळे निवडणुकीची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.
बाजार समितीची निवडणूक असली तरी दुसरीकडे ही निवडणूक म्हणजे निफाड तालुक्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची वाटू लागली आहे. विधानसभेचा ट्रेलर असल्याचे बोललं जात असून गावागावात चर्चा घडू लागल्या आहे.
आजी – माजी आमदारांनी निवडणूक आखाड्यात दंड थोपटले असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येत्या काळात निवडणुकीत कोण बाजी मारणार ही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.